मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज पक्षाच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला भाजपमधील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सध्या राज्यभरात मराठा समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपची आगामी रणनीती ठरविण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे समजते. आज रात्री ही बैठक पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री आणि भाजपमधील वरिष्ठ मराठा नेत्यांमध्ये मराठा समाजासंदर्भातील परिस्थिती कशाप्रकारे हाताळायची याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे, सुभाष देशमुख, चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पक्षातील बडे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत मराठा समाजासंदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मराठवाडा व विदर्भापुरते मर्यादित असलेल्या या मोर्च्यांचे लोण पश्चिम महाराष्ट्रातही पसरण्याची शक्यता आहे. येत्या २५ सप्टेंबरला पुण्यात मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. सकाळी १०.३० वाजता पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील मुठा नदीच्या मोकळ्या मैदानापासून या मोर्चास सुरुवात होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका टॉकिज चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौक, संत कबीर चौक, नाना पेठ, क्वार्टर गेट, हॉटेल शांताईमार्गे लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद, हॉटेल ब्लू नाइलमार्गे विधान भवनावर हा मूकमोर्चा धडकेल. कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय हा मोर्चा काढणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चाचा सर्वच राजकीय पक्षांना धसका
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मराठा समाजातर्फे मोर्चे काढण्यात येत आहेत. या मराठा क्रांती मूक मोर्चांमध्ये जनतेचा सहभाग लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाखोंचा जनसमुदाय असणारे हे मोर्चे राजकीय पक्षांच्यादृष्टीने प्राधान्याचा विषय बनला आहे. मात्र, तरीही भाजपसह कोणत्याही राजकीय पक्षाकडून यासंदर्भात ठोस अशी भूमिका घेण्यात आली नव्हती. याच पार्श्वभूमीवर आज वर्षा बंगल्यावरील बैठकीनंतर भाजपकडून ठाम भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत संभाजीनगर, उस्मानाबाद, जळगाव, बीड आणि परभणी येथे निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्च्यांमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेतील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा करावी, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आदी मागण्या या मोर्च्यांद्वारे मांडण्यात आल्या आहेत. कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघत नसताना त्यातील लाखोंच्या सहभागाने ज्येष्ठ राजकीय नेतेही चकीत झाले आहेत. याशिवाय, महाराष्ट्राच्या राजकारणातील मराठा समाजाचे प्राबल्य पाहता आगामी काळात राजकीय पक्षांना यासंदर्भात ठोस भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे. मोर्चामागे
सवर्णामधील वादात दलितांचा वापर