करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश २१ दिवसांसाठी म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉक डाउन करण्यात आला आहे. करोनाचा फैलाव रोखायचा असेल तर घरातच थांबा असं आवाहन राज्य आणि केंद्र सरकारतर्फे वारंवार करण्यात येतं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल डिस्टंस पाळा असं आवाहन केलं आहे. हे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाळलं आहे. कारण वर्षा या त्यांच्या निवासस्थानी करोनावर उपाय योजण्यासाठी जी बैठक पार पडली त्या बैठकीत त्यांनी हे अंतर पाळलेलं दिसलं.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १२५ च्या वर गेली आहे. तर देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन वारंवार केंद्र आणि राज्य सरकारकडून केलं जातं आहे. लोकही सोशल डिस्टंस पाळू लागले आहेत. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना, किराणा मालाच्या दुकानात जाताना रांग लावून आणि एक एक करुन लोक जात आहेत. जेव्हा देश लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला तेव्हा काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता मात्र परिस्थितीत बरीच सुधारणा आहे.

करोनाचा धोका टाळायचा असेल तर तो घरात बसूनच टाळता येईल हे लोकांना पटलं आहे. त्यामुळेच देशातला लॉकडाउन आणि महाराष्ट्रातली संचारबंदी ही यशस्वी झालेली दिसते आहे. २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत असंच चित्र राहिलं तर करोनाविरुद्धचा लढा यशस्वी होईल अशी आशा करायला हरकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कृतीतून सोशल डिस्टंस कसं राखा ते दाखवून दिलं आहे.