देशात करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले असताना त्यामध्ये सर्वाधिक नवे रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अधिक वेगाने लसीकरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. त्यावरच तोडगा शोधण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या हाफकिन संस्थेला भेट दिली. “करोनाच्या लसीचं उत्पादन किंवा त्यासाठी फिल अँड फिनीश करण्यासाठी देखील हाफकिनला लागेल ती मदत करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल आणि हाफकिनला पुन्हा ताकद देण्यात येईल”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, पूर्ण महाराष्ट्रात लसीकरण करण्यासाठी किमान २५ ते २६ कोटी लसींचे डोस आवश्यक असून सध्या काही दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आपल्याकडे असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

हाफकिनमध्ये ‘फील अँड फिनीश’ होणार?

हाफकिन संस्थेला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मी हाफकिनबद्दल बोललो. देशाला पोलिओमुक्त करण्यामध्ये हाफकिनचं मोलाचं काम आहे. हाफकिनला पुन्हा ताकद देण्याची आवश्यकता आहे. त्यांची क्षमता वाढवण्याची गरज असेल, तर राज्य सरकार त्यांच्या पाठिशी आहे. सध्या लस बनवणाऱ्या इतर कंपन्यांसोबत आपण इथे लस तयार करू शकतो का किंवा फील अँड फिनीश करू शकतो का? याचा आढावा आपण घेत आहोत. हाफकिनमध्ये अशा व्हायरसबाबत संशोधन सुरू राहील, यासाठी हाफकिनला जे हवं ते देण्याचं सरकारने ठरवलं आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे हे फील अँड फिनीश?

व्हॅक्सिन तयार झाल्यानंतर ती वेगवेगळ्या व्हायाल्स (व्हॅक्सिन ट्यूब)मध्ये भरून त्याचं पॅकेजिंग होत असतं आणि त्यानंतरच या व्हॅक्सिनच्या व्हायाल वितरीत होत असतात. या व्हायाल भरण्याच्या प्रक्रियेला फार्मा क्षेत्रामध्ये फिल म्हणतात. आणि तिचं पॅकेजिंग करण्याच्या प्रक्रियेला फिनिश म्हणतात. या प्रक्रियेला फिल अँड फिनीश किंवा फिल-फिनीश किंवा फिल/फिनीश असं देखील संबोधलं जातं. सध्या ही प्रक्रिया लस बनवणाऱ्या कंपन्यांकडूनच केली जात आहे. जर हाफकिनमध्ये लसीचं फिल अँड फिनीश झालं, तर लस वितरण अधिक वेगाने होऊ शकेल आणि लसीकरणाचा वेग वाढेल, असा अंदाज आहे.

लॉकडाऊन शेवटचा पर्याय!

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करणं हा शेवटचा पर्याय असेल, असं स्पष्ट केलं आहे. “लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. पण जर आपल्याला करोनासोबत जगायचं असेल, तर मास्क घालणे, हात धुणे आणि अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावाच लागेल. अनावश्यक गर्दी टाळावीच लागेल. दुर्दैवाने त्यात फरक पडला नाही, तर लॉकडाऊन हा एकमेव मार्ग असेल. आत्ता करोनाची लाट आल्यात जमा आहे. रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.