शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज रविवार कोस्टल रोड (सागरी किनारा मार्ग ) प्रकल्पाचे भूमपूजन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांना या कार्यक्रममाला आमंत्रित न केल्यामुळं शिवसेना आणि भाजपा आंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच वाहतुकीला गती देण्यासाठी नरिमन पॉईंट ते वरळीदरम्यान मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या सागरी मार्गासाठी राजकीय पक्षामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या कार्यक्रमावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भूमिपूत्राला भकास करुन मुंबईचा विकास करणार नाही असे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे कोळी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोळी बांधवांच्या मनात भीती आहे. त्यांनी काळजी करू नये. कोळी बांधवांच्या कोणत्याही गोष्टीला हात लागणार नसल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. कोणाला भकास करून विकास करायचा नाही, कोस्टल रोड टोल फ्री असेल, असे अश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.’ दरम्यान, उद्वव ठाकरे यांनी यावेळी भाजपाचे आभार मानले. मुंबईकरांच्या महत्वाच्या विकासकामासाठी आडवे न आल्याबद्दल राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार मानले.

 मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर कार्यालयीन वेळेमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना तासन्तास वाहनांमध्ये अडकून पडावे लागते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीदरम्यान सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सागरी सेतूदरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्यात येणार आहे. या टप्प्यातील प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ९.९८ कि.मी. लांबीच्या सागरी किनारा मार्गाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले.