उपनगरातील किमान तापमानातील घट या आठवडय़ात कायम असून, शुक्रवारी मोसमातील सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले.

उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यातील विशेषत: उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होत आहे. मुंबईत उपनगरात किमान तापमान आठवडय़ाच्या सुरुवातीस २० अंशाखाली घसरले. दोन दिवसांपूर्वी ते १५ अंशापर्यंत पोहचले, शुक्रवारी त्यामध्ये आणखी घट होऊन सांताक्रूझ केंद्रावर १४.८ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. या मोसमात (डिसेंबरपासून) प्रथमच किमान तापमान १५ अंशाखाली गेले असून, ते मोसमातील सर्वात कमी किमान तापमान आहे. शनिवारी त्यामध्ये फार मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. मात्र त्यानंतर त्यामध्ये हळूहळू वाढ होऊ  शकते असे अनुमान आहे.

सांताक्रूझ केंद्रावर तापमानात घट झाली असली तरी कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिर असून १७.५ अंश राहिले.

किमान तापमानात घट झाली असताना शुक्रवारी दोन्ही ठिकाणी कमाल तापमान एक अंशाने वाढले असले तरी ते ३० अंशाखाली आहे.

तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक अति वाईट स्तरावर होता, शुक्रवारी त्यात थोडी सुधारणा होऊन तो वाईट स्तरावर आला. सर्वाधिक प्रदूषण मालाड आणि कुलाबा येथे नोंदविण्यात आले.