जुलैच्या पहिल्या आठवडय़ातील जोरदार पावसानंतर मुंबईत सर्दी, तापाने उचल खाल्ली आहे. हवेतून पसरणाऱ्या विषाणूंमुळे तापाची साथ मुंबईत वाढीला लागली आहे. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये फार वाढ झाली नसली तरी साध्या तापामुळे मुंबईकर फणफणले आहेत.

जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर विषाणूसंसर्गामुळे सर्दीतापाची साथ आली होती. त्यानंतर पावसाने काही काळ दडी मारल्यानंतर ही साथ ओसरली होती. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासूनच  पावसाने मुंबईला झोडपून काढले. हवेतील दमटपणा वाढल्याने विषाणूंची संख्या वाढली आहे. याचाच परिणाम दिसू लागला असून तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तापाच्या रुग्णांमध्ये सुमारे २५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण कमी असले तरी विषाणूसंसर्गाचे आजार दिसू लागले आहेत. ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढत असल्याचे डॉक्टर जयेश लेले यांनी सांगितले.

पोटदुखी, जुलाब आणि उलटी या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्येही गेल्या आठवडाभरात वाढ झाली आहे. पावसाळ्यात मच्छरांचे प्रमाण वाढते. बाहेरील आणि उघडय़ावरच्या पदार्थावर घोंघावणाऱ्या माश्यांमुळे पदार्थ दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो बाहेरील पदार्थ आणि पाणी पिणे टाळावे, असा सल्ला डॉ. सुरेश माने यांनी दिला आहे.

खबरदारी घ्या

  • पावसात भिजल्यास तत्काळ ओले कपडे बदलून अंग कोरडे करावे.
  • तुंबलेल्या पाण्यातून चालू नये.
  • पाणी उकळून प्यावे.
  • ताप आल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • दोन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.

संशयित रुग्णांत वाढ

जून महिन्यामध्ये २९७ रुग्ण डेंग्यूची लक्षणे दिसून आल्याने उपचारासाठी पालिका रुग्णालयामध्ये दाखल झाली होती, तर जुलै महिन्यात पहिल्याच पंधरा दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ३६९ वर पोहोचली आहे. गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. जून महिन्यामध्ये ७७९ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. १ ते १५ जुलै या कालावधीत ५१९ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे नोंदले आहे.