‘ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल’चा साडेआठ तासांचा कार्यक्रम

देशोदेशीच्या समस्यांचा विचार करून त्या देशांमध्ये सामाजिक मोहीम राबविणाऱ्या ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसोबत सुरेल प्रवास करणारा ‘कोल्डप्ले’ हा बँड शनिवारी मुंबईत भारतातला आपला पहिलावहिला कार्यक्रम सादर करणार आहे. जगाला वेड लावणाऱ्या या बँडने मुंबईच्या पाश्चात्य संगीतप्रेमींमध्येही उत्साहाची लाट उसळली असली तरी मुंबईसह देशभरातील नागरिक चलनसंकटाने ग्रासून बँकांबाहेर रांगा लावत असतानाच अनेक पक्षांनी या कार्यक्रमाविरोधात सूर उमटविला आहे.

जागतिक ख्याती लाभेपर्यंतचा या बँडचा प्रवासही आगळावेगळाच होता. लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये दाखल झालेल्या दोन तरुणांना संगीताच्या ओढीने एकत्र आणले. त्यांना आणखी दोन संगीतवेडय़ांची साथ लाभत गेली. छोटय़ा क्लबमध्ये बँड वाजवण्यापासून सुरू झालेल्या या प्रवासाला विशाल रूप मिळाले आणि सुरुवातीला ‘पेक्टोराल्झ’, त्यानंतर ‘स्टारफिश’ अशा नावांनी सुरू झालेला हा चमू ‘कोल्डप्ले’ नावाने ओळखला जाऊ लागला. या चमूचा संस्थापक क्रिस मार्टिनने एवढय़ावरच न थांबता ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसह आपल्या बँडची लोकप्रियता जोडून न्यूयॉर्क शहरातच अनेक कार्यक्रम केले.  या बँडचा भारतातील पहिलावहिला कार्यक्रम शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात ‘कोल्डप्ले’मधील क्रिस मार्टिन, जॉनी बकलँड, गाय बेरीमान आणि विल चॅम्पियन हे चौघे जगप्रसिद्ध कलाकार चाहत्यांना वेड लावण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या जोडीने शंकर-एहसान-लॉय, ए. आर. रेहमान, शिलाँग कॉयर ग्रुप, अर्जित सिंग, श्रद्धा कपूर आदी देशी कलाकारही आपली कला सादर करणार आहेत. दुपारी दीडपासून सुरू होणाऱ्या साडेआठ तासांच्या या महोत्सवात कलेच्या माध्यमातून लैंगिक समानता, शिक्षण, स्वच्छता, शुद्ध पाणी आणि आरोग्य या मुद्दय़ांना स्पर्श केला जाणार आहे.

करमाफीचा प्रश्न सरकारचा!

आमचा महोत्सव सामाजिक कार्याशीच जोडला असल्याने आम्ही करमाफी मागणार आहोत. ती द्यावी का नाही, हा निर्णय सरकारचा असेल, असे ग्लोबल सिटिझनच्या संस्थापकांनी स्पष्ट केले. या महोत्सवाची तिकिटे २५ हजार ते पाच लाख रुपयांदरम्यान असल्याने या करमाफीस विरोध सुरू आहे. त्याबाबत संस्थेने सांगितले की, सामाजिक कार्य करणाऱ्यांना ८० टक्के तिकिटे मोफत दिली गेली आहेत. एकही कलाकार मानधनही घेणार नाही.