करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची वर्दळ नसली तरी छळ, चिडवाचिडवी होत असल्याच्या (रॅगिंग) तक्रारी बंद झालेल्या नाहीत. मार्च ते ऑक्टोबरअखेपर्यंत राज्यातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मदत वाहिनीवर याबाबतच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

वर्गातील शिक्षणाची जागा संगणक आणि मोबाइलवरील तासिकांनी घेतली. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्यांच्यातील विकोपाला गेलेली भांडणे, चिडवाचिडवी, मारामाऱ्या, शेरेबाजीच्या म्हणजेच रॅगिंगच्या घटना समोर येतात. गेल्या वर्षी देशातील १ हजार ७० विद्यार्थ्यांनी रॅगिंग होत असल्याची तक्रार केली होती. यंदा महाविद्यालये बंद असली तरी रॅगिंगच्या तक्रारी बंद झालेल्या नाहीत.

रॅगिंगच्या तक्रारी नोंदवून त्याचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, मार्च ते ऑक्टोबर अखेपर्यंत राज्यातून रॅगिंगच्या साधारण १५ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. नुकतीच १ नोव्हेंबर रोजी आणखी एक तक्रार नोंदवण्यात आली. मुंबई, पुणे, आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांसह काही खासगी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी या तक्रारी केल्या आहेत. या कालावधीत देशभरात १७५ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

प्रवृत्ती कायम..

रॅगिंगबाबत देशभरातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची यादृच्छिक निवड करून सर्वेक्षण केले जाते. प्रत्यक्षात नोंदवण्यात आलेल्या तक्रारींची संख्या कमी दिसत असली तरीही रॅगिंगची प्रवृत्ती कायम असल्याचे या सर्वेक्षणांवरून दिसून येते. यंदा १८ एप्रिल ते ५ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात देशातील २ लाख ९१ हजार ५१७ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ३.७२ टक्के विद्यार्थ्यांनी रॅगिंग होत असल्याचे मत नोंदवले आहे. एक टक्का विद्यार्थ्यांनी गंभीर ते अतिगंभीर स्वरूपाचे रॅगिंग झाल्याचे दिसत आहे.

ऑनलाइन वर्गातही ..

* ऑनलाइन वर्ग, विद्यार्थ्यांचे व्हॉट्स अ‍ॅप गट हे रॅगिंगचे नवे माध्यम झाले आहे. ऑनलाइन वर्ग शिक्षकांच्या देखरेखीतच भरत असले तरी त्यावर १०० टक्के नियंत्रण ठेवणे प्रत्येक वेळी शक्य नसते. त्याचप्रमाणे शिक्षक नसलेले विद्यार्थ्यांचे अनेक अनौपचारिक गट असतात. त्यावरही नियंत्रण नसते. मात्र, या ग्रुप्सवर किंवा ऑनलाइन वर्ग झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये चिडवाचिडवीचे प्रकार घडतात.

* असे प्रकार कानावर आल्यास विद्यार्थ्यांना समज दिली जाते. प्रत्येक वेळी या प्रकारांच्या तक्रारीही होतातच असे नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी त्रास होत असल्यास त्यांनी शिक्षकांशी संपर्क साधावा असे त्यांना सातत्याने सांगितले जाते. दरवर्षी महाविद्यालये सुरू होताना पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. यंदा ऑनलाइन शैक्षणिक वर्षांत असे उपक्रम झालेले नाहीत, असे एका प्राचार्यानी सांगितले.