महाराष्ट्रात दुष्काळाच्या भीषण चक्रात गेल्या एक महिन्यात साधारण दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यावर संवेदनशीलता बाळगत या वर्षी मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळत कोरडी आणि सुरक्षित होळी साजरी केली. मुंबईकरांनी आपल्या कल्पनांना वाट करून देत रंगाची, फुलांची अनोखी धुळवड साजरी केली.
माहीम येथील शांती को-ऑप. सोसायटीने होळीच्या निमित्ताने रंगांची उधळण केली. मात्र ती पिचकारी आणि फुग्यांनी एकमेकांवर नाही, तर रंगांची ही उधळण भिंतीवर करण्यात आली आहे. सोसायटीने होळीच्या दिवसांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी रंगांचा सण सोसायटीच्या भिंती रंगवून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सोसायटीने खास निधीही मंजूर करून दिला आणि तयारी सुरू झाली ‘रंगीत चित्रांच्या होळीची’. यासाठी सर्वाच्या संमतीने ‘जंगल’ हा विषय निश्चित करण्यात आला. निसर्गाचे रूप भिंतीवर चितारण्यासाठी तरुणांनी सोसायटीतील काही भिंती ठरवून त्यावर एक दिवसापूर्वी रेखाटने काढली. धुळवडीच्या दिवशी सकाळी आठ वाजता लहान मुलांबरोबर त्यांचे पालक आणि तरुण मंडळींनी हातात कुंचला घेऊन भिंती रंगविण्याची सुरुवात केली. यंदाची होळी आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली असल्याचे शांती सोसयटीचे अध्यक्ष अभय देशपांडे यांनी सांगितले. दरवर्षी होळी साजरी करताना पाण्याची आणि रंगांची उधळण करीत होळी साजरी केली जाते. मात्र भिंतीवर उधळलेल्या रंगांतून एक सुंदर कलाकृती निर्माण होते आणि त्यामुळे होळीच्या स्मृतींना वर्षभर उजाळा मिळेल. यानिमित्ताने आमची सोसायटीही सुशोभित झाल्याने सोसायटीतील सदस्य आनंदात आहेत.
या वेळी भिंतींवर निसर्गचित्र, विविध प्राणी, फुले, झाडे आणि मुलांचा चाहता जंगलाचा हिरो मोगली, प्राण्यांची वेगवेगळी व्यंगचित्र साकारण्यात आले होते. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक स्वतंत्र भिंत त्यांच्यासाठी राखून ठेवली होती. त्यावर बच्चे कंपनीने त्यांच्या कल्पनेनुसार वेगवेगळे प्राणी आणि व्यंगचित्रे रेखाटली. या वेळी सोसायटीतील रहिवाशांनी आपल्या मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने, हसतखेळत आणि कल्पक अशी होळी साजरी केली. सण, उत्सव हा नात्यांना आणि जिवलगांना भेटण्याचा सण आहे, पण सध्या त्याला धांगडधिंग्याचे रूप आल्यामुळे सणांचा खरा अर्थच आपण विसरत चाललो आहोत. मात्र शांती सोसायटीने या वर्षी दुष्काळी परिस्थितीचे भान राखत भिंती रंगवून अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. या वेळी खऱ्या अर्थाने धुळवड साजरी करताना रंगांचे महत्त्व आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर त्यातून कितीतरी अनोख्या गोष्टी साध्य होऊ शकतात याची प्रचीती आल्याची भावना या वेळी सोसायटीच्या रहिवाशांनी व्यक्त केली.