मुंबई : करोनामुळे मृत्यू झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत असून, ३० सप्टेंबपर्यंत प्रस्तावित असलेल्या या योजनेला ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पालिकेच्या विविध विभागातील १५७ कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत करोनाशी सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढण्यात आला आहे. त्या अंतर्गत भरपाईसाठी पालिकेने कर्मचाऱ्यांसाठी अर्ज केले असता केवळ आरोग्य विभागातील ११ कर्मचाऱ्यांचेच अर्ज विमा कंपनीने मंजूर केले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने स्वत:ची सानुग्रह अनुदान योजना जाहीर केली होती. या योजनेला आता ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, सर्वेक्षण करणे, प्रतिबंधात्मक कामे करणारे, चाचणी, उपचार व मदत कार्ये या पद्धतीचे काम करणाऱ्या विविध प्रवर्गातील कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यासाठी सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पालिकेने सहा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान दिले आहे.

केवळ ११ अर्ज मंजूर : ज्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत नुकसानभरपाईसाठी अर्ज केले होते, त्यापैकी केवळ ११ अर्ज मंजूर झाले असून ७७ अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेने आता प्रक्रिया सुरू केली आहे.