पावसाच्या तडाख्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांची नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता यावी यासाठी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतील अभियंत्यांना मोबाइल दिले असून मोबाइलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून छायाचित्रासह खड्डय़ाची तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

खड्डय़ाचे छायाचित्र आणि तो कोणत्या रस्त्यावर नेमका कुठे आहे याची माहिती मिळताच शक्य तितक्या लवकर त्याची दुरुस्ती करण्याचा पालिकेचा मानस आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांची छायाचित्रे मोबाइलवरून थेट पालिकेला पाठविण्याची ‘पॉटहोल ट्रेकिंग’ ही संगणकीय यंत्रणा पालिकेने कंत्राटदाराच्या माध्यमातून उभारली होती. या यंत्रणेद्वारे नागरिकांनी माबाइलवरून पाठविलेल्या खड्डय़ांची छायाचित्रे अभियंत्यांना पाठविण्यात येत होती. अभियंते खड्डय़ांची पाहणी करून दुरुस्ती करण्यासाठी खड्डय़ांची छायाचित्रे कंत्राटदाराला पाठवत होते. कंत्राटदाराने दुरुस्ती केल्यानंतर त्याची छायाचित्रे काढून तक्रारदाराला पाठविण्यात येत होती. मात्र ही यंत्रणा पालिका प्रशासनाने बंद करून नागरिकांना फेसबुकवर खड्डय़ांची छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता प्रशासनाने २४ विभाग कार्यालयांमधील प्रत्येकी एका अभियंत्याला मोबाइल दिला असून या मोबाइलवर खड्डय़ांची छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये तुलनेने अधिक परिसर येतो. अशा ठिकाणच्या विभाग कार्यालयांसाठी दोन मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी २४ विभाग कार्यालयांमधील अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक नागरिकांना देण्यात आले होते. मात्र हे मोबाइल क्रमांक वैयक्तिक असल्यामुळे अभियंत्यांनी त्यावर नागरिकांच्या तक्रारी घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने मोबाइल आणि सिमकार्ड खरेदी केली होती. आता यंदा मोबाइलवर  अभियंत्यांना नागरिकांच्या तक्रारी स्वीकाराव्या लागणार आहेत.

विभाग कार्यालयातील अभियंत्यांना दिलेले मोबाइल क्रमांक खालीलप्रमाणे-

‘ए’ – ८८७९६५७६९८, ‘बी’ – ८८७९६५७७२४, ‘सी’ – ८८७९६५७७०४, ‘डी’ – ८८७९६५७६९४, ‘ई’ – ८८७९६५७७१२, एफ-उत्तर – ८८७९६५७७१७, एफ-दक्षिण – ८८७९६५७६७८, जी-उत्तर ८८७९६५७६८३, जी-दक्षिण – ८८७९६५७६९३, एच-पूर्व – ८८७९६५७६७१, एच-पश्चिम – ८८७९६५७६३३, के-पूर्व – ८८७९६५७६५१, के-पश्चिम – ८८७९६५७६४९, पी-दक्षिण – ८८७९६५७६६१, पी-उत्तर – ८८७९६५७६५४, ‘आर-दक्षिण’ – ८८७९६५७६५६, आर-उत्तर – ८८७९६५७६३६, आर-मध्य – ८८७९६५७६३४, एल – ८८७९६५७६२२ / ८८७९६५७६१०, एम-पूर्व – ८८७९६५७६१२, एम-पश्चिम – ८८७९६५७६०८ / ८८७९६५७६१४, एन – ८८७९६५७६१७ / ८८७९६५७६१५, एस – ८८७९६५७६०३ / ८८७९६५७६०५, टी – ८८७९६५७६०९ / ८८७९६५७६११.