संदीप आचार्य

मुंबईतील मृतांची आकडेवारी सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत स्पष्ट होतील, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी जाहीर केले होते. मात्र अद्याप ही आकडेवारी समोर न केल्याने पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

केईएम रुग्णालयातील मृत्यू दर हा २५ टक्के, तर शीव रुग्णालय २३ टक्के आणि नायर रुग्णालयाचा मृत्यू दर १२ टक्के असल्याचे आढळून आले आहे. अन्य काही पालिका रुग्णालयांतील मृत्यू दर हाही ११ ते १८ टक्यांच्या आसपास असून याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, आमच्याकडे येणारे जवळपास सर्व रुग्ण हे गंभीर व अतिगंभीर अवस्थेतील असतात. जवळच टाटा कर्क रुग्णालय असून करोनाची लागण असलेले कर्करुग्ण मोठय़ा प्रमाणात आमच्याकडे दाखल होतात. या रुग्णांची एकूणच परिस्थिती गंभीर असल्याने त्यांच्यावरील उपचार हे एक मोठे आव्हान असते. त्यामुळे अन्य कोणत्याही रुग्णालयातील मृत्यू दर व आमच्याकडील मृत्यू दर यांची तुलनाच करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, बहुतेक वेळा खासगी रुग्णालयातून मृत्यूच्या दारात असलेले रुग्ण आमच्याकडे पाठवले जातात. आम्ही कोणताच रुग्ण नाकारत नाही. मात्र अतिगंभीर रुग्ण चोवीस तासांत मृत्यू पावतात आणि आमचा मृत्यू दर वाढलेला दिसतो.

शिल्लक मृत्यूच्या संख्येमुळेच मुंबईतील मृत्यू दर वाढलेला दिसतो. अन्यथा प्रत्यक्षात तो कमीच आहे, हे मुंबईतील रोजच्या मृत्यूच्या संख्येवरून स्पष्ट होते, असे केईएमचे माजी अधिष्ठाता व पालिकेच्या ‘डेथ ऑडिट समिती’चे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केले. दर आठवडय़ाला मृत्यूंची कारणमीमांसा केली जात असून उपचाराची नवीन मार्गदर्शक तत्त्वे वापरल्याने उपचारात गती येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

राज्यात काय खबरदारी?

जेजेसह राज्यातील १८ शासकीय रुग्णालयांतील करोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू दर याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता ते म्हणाले, गंभीर रुग्णांवरील उपचारांचा आढावा घेण्यासाठी चार प्राध्यापकांची एक समिती नियुक्त केली आहे. उपचारात काही नवीन बदल करावयाचे असल्यास ही समिती सर्वाशी चर्चा करून दर सोमवारी बदल सुचवते. जूनपासून आम्ही आठवडय़ातून चार वेळा  बैठक घेत आहोत. या बैठकीत मृत्यूच्या कारणांचाही विचार करून गंभीर रुग्णांचे मृत्यू टाळण्यासाठीच्या उपाययोजना निश्चित केल्या जातात. त्यामुळेच आम्ही जास्तीत जास्त रुग्णांना वाचवू शकतो, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.