काँग्रेस व राष्ट्रवादी पुन्हा एकदा जवळ येऊ लागल्याने त्यात खोडा घालण्याकरिता भाजपने पद्धतशीरपणे गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला मदत केली आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीमध्ये उमटली. या खेळीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची तीन दिवसांची एकजूट संपुष्टात आली व राष्ट्रवादीने सभागृहात काँग्रेसची साथ सोडली. स्थानिक नेत्यांच्या प्रतापामुळे नाक कापले गेलेल्या काँग्रेसने संबंधित आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविले असून, सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याकरिता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेले तीन दिवस दोन्ही काँग्रेसमध्ये सूत जमले होते. कामकाजावर बहिष्कार घालून दोन्ही पक्षांच्या आमदारांनी एकत्रित आंदोलन केले. हा वाढता एकोपा त्रासदायक ठरू शकतो हे भाजपच्या धुरिणांच्या लक्षात आले. गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदेची सत्ता गमवावी लागल्याने आधीच भाजपमध्ये अस्वस्थता होती. काँग्रेसचे आमदार गोपाळ अगरवाल आणि राष्ट्रवादीचे तणावपूर्ण संबंध लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगरवाल यांना भरीस घातल्याची चर्चा आहे. काँग्रेसला मदत केली तरी त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत, उलट काँग्रेसलाच ते तापदायक ठरेल हे भाजपच्या नेत्यांनी हेरले व त्यानुसारच खेळी करण्यात आली. काँग्रेसला मदत करण्याचा भाजपचा डाव पुरता यशस्वी झाला.
गोंदियामध्ये काँग्रेस आणि भाजपची युती झाल्याने राष्ट्रवादीला निमित्तच मिळाले व विधिमंडळात काँग्रेसची साथ सोडली. राष्ट्रवादीचे आमदार कामकाजात सहभागी झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वाढत्या एकजुटीत फांदा घालण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला. काँग्रेसने काही काळ कामकाजावर बहिष्कार घातला होता, पण दुपारी काँग्रेसचे आमदारही कामकाजात सहभागी झाले. कर्जमाफी शक्य नाही, असे वक्तव्य आपण केलेले नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने काँग्रेसनेही कामकाजावरील बहिष्कार मागे घेतला.
गोंदियाचे निमित्त करीत राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली. विधान परिषद सभापतींच्या विरोधात भाजपच्या मदतीने अविश्वासाचा ठराव राष्ट्रवादीने केला होता. तेच आम्ही धरून बसलेलो नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.

गोंदियाचे आमदार गोपाळ अगरवाल तसेच जिल्हाध्यक्षांकडून पक्षाने स्पष्टीकरण मागविले आहे. उद्या सर्वाना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. आमदाराची पक्षातून हकालपट्टी केल्यास विधानसभेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे समसमान संख्याबळ होऊन विरोधी पक्षनेतेपदाचा वाद निर्माण होऊ शकतो. यामुळेच काँग्रेसला सावध पावले टाकावी लागणार आहेत.