राष्ट्रवादीचा रायगडवर डोळा असतानाच याबदल्यात हिंगोलीचा जागा मिळावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
रायगडमधून जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना रिंगणात उतरविण्याची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची योजना आहे. रायगडमध्ये काँग्रेसकडे प्रबळ उमेदवाराची वानवाच आहे. राष्ट्रवादीकडून बदल्यात दुसरा चांगला मतदारसंघ मिळणार असल्यास रायगड सोडण्याची काँग्रेसची तयारी
आहे.
राष्ट्रवादीने हातकणंगले, जळगाव, रावेर अथवा अमरावती मतदारसंघ रायगडच्या बदल्यात सोडण्याची तयारी दर्शविली होती, पण यांपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसला नको आहे. काँग्रेसने हिंगोली मतदारसंघावर दावा केला आहे. हिंगोली मतदारसंघातून २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील निवडून आल्या होत्या.  गेल्या वेळी त्या पराभूत झाल्या.
यावेळी पुन्हा लढण्याची तयारी त्यांनी केली आहे. हिंगोलीतून  युवक काँग्रेसचे राष्ट्रीय  अध्यक्ष राजीव सातव यांना उमेदवारी देण्याची काँग्रेसची योजना आहे. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यास सूर्यकांता पाटील बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.