५२ नगरसेवक असूनही महापालिकेत आवाज घुमलाच नाही
फेररचनेचा ‘फेरा’

तब्बल ५२ नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेतील शिवसेनेनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा बलाढय़ पक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद असूनही गेल्या पाच वर्षांत काँग्रेसचा आवाज पालिका सभागृहात म्हणावा तसा घुमलाच नाही. खड्डे, डेंग्यू-मलेरिया, नालेसफाई, रस्ते घोटाळा असे अनेक विषय हाताशी असूनही काँग्रेसला त्याचा फायदा घेता आला नाही. उलट विविध विषयांवर बोलण्याची योग्यता असलेल्या नगरसेवकांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवले गेले. नगरसेवकांबरोबरच पक्षाच्या स्तरावर असलेली दुफळीही आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या मुळावर येणार आहे. कधी नव्हे एवढय़ा मलूल झालेल्या या पक्षाला प्रभागांची फेररचना व बदललेल्या आरक्षणाचा काही ठिकाणी तोटा होईलही मात्र त्यापेक्षाही पाच वर्षे पालिकेत राखलेल्या ‘शांतते’चा फटका पक्षाला बसेल.

देशाच्या ग्रामीण भागात हातपाय पसरलेल्या काँग्रेसला काही काळासाठी नामोहरम करता येत असले तरी हा पक्ष पुन्हा पुन्हा गवताप्रमाणे उगवत राहतो. जे देशात तेच चित्र मुंबईत. मुंबईतील गावठाणे, गरीब वस्त्या, मुस्लिमबहुल भाग ही काँग्रेसची परंपरागत ठाणी. याच मतदारांच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर काँग्रेस तग धरून आहे. २०१२ च्या पालिका निवडणुकांमध्ये ५२ जागा जिंकत सत्ताधारी शिवसेनेनंतरचा मोठा पक्ष म्हणून पालिकेत जागा मिळवली. मात्र भाजपा आणि मनसेपेक्षा जवळपास दुप्पट जागा असतानाही या पक्षाला गेल्या पाच वर्षांत कायम चौथे स्थान मिळाले. विरोधी पक्षनेतेपद हाताशी असले तरी काँग्रेसपेक्षा मनसेच विरोधी पक्षाची भूमिका अधिक त्वेषाने लढताना दिसली. पाच वर्षांत तिघांकडे पक्षनेतेपद देऊनही काँग्रेसमधील दुफळी कायम राहिली आणि ती सभागृहात आवाज उठवतानाही स्पष्ट दिसली नाही.

आजही ५० टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्या झोपडपट्टय़ांमध्ये असल्याने काँग्रेसला साहजिकच फायदा होतो. मालाड-कांदिवलीत समता नगर, महिंद्रा कंपनी, वडारपाडा, इराणीवाडी, अप्पापाडा, न्यू कलेक्टर्स, पिरामल नगर येथे काँग्रेसचे नगरसेवक २०१२ मध्ये निवडून आले. सांताक्रूझ, खार, वांद्रे, धारावी, शीव येथील गरीब वस्त्यांमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना यश मिळाले होते. यावेळी झालेल्या प्रभागरचनेत हे सर्व भाग वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत. मुस्लिमबहुल असलेले प्रभाग तीन ते चार भागात विभागून एकगठ्ठा मते असलेल्या वस्त्या फोडल्या गेल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक करतात. मात्र ही मते फोडली तरी दुसऱ्या विभागातील काँग्रेसी कार्यकर्त्यांना त्याचा फायदा होत असल्याने बदललेल्या प्रभागरचनेचा मोठा तोटा काँग्रेसला होणार नाही.

झोपडय़ांवरील कारवाईचा फायदा

नवीन प्रभागरचना करताना गुजराती किंवा उच्चमध्यमवर्गीय मराठी मतदार यांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला आहे. दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगावमध्ये वाढलेल्या प्रभागांमध्ये, माटुंगा, भांडुप, मुलुंडमधील अनेक प्रभाग दिसत आहेत. काँग्रेसच्या मूळच्या प्रभागांमधील काही भाग फुटून बाहेर निघाला असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसी मतदारांना धक्का लागलेला नाही.

३० महिला नगरसेविका

काँग्रेसच्या ५२ नगरसेविकांपैकी तब्बल ३० महिला नगरसेविका आहेत आणि तरीही पालिकेत या नगरसेविका कायम दुसऱ्या फळीतच राहिल्या. अनेक नगरसेविकांची नावे पाच वर्षांनंतरही पालिका वर्तुळात अपरिचित राहिली. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेस पक्ष महिला नगरसेवकांच्या जोरावर पुढे आला असला तरी सेनेच्या नगरसेविकांप्रमाणे काँग्रेसच्या काहींचा अपवाद वगळता इतर नगरसेविकांना स्वतचा मतदार बांधता आलेला नसल्याने पक्षाला यावेळी नव्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल.