दिल्लीत आज सोनिया गांधी यांना भेटणार

भाजप व शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद, त्यामुळे सत्ता स्थापनेस होत असलेला विलंब व निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणात गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा केली.

भाजप व शिवसेना यांच्यात बिनसले आहे, त्यांच्यात समेट झाला नाही तर किंवा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणे शक्य आहे का, याबाबत काँग्रेसमधूनही अनुकूल मतप्रदर्शन होत आहे. परंतु हा निर्णय दिल्लीच्या स्तरावर होऊ शकतो, याची जाणीव असल्याने काँग्रेसचे नेते त्याबाबत सावध भूमिका घेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही सध्या भाजप-शिवसेनेच्या पातळीवर ज्या घडामोडी घडत आहेत, त्याबाबत थांबा आणि वाट पहा, अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी बैठक झाली, त्यात बोलताना शरद पवार यांनी या पुढेही जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होण्याच्या आमदारांना सूचना केल्या, परंतु सध्या भाजप-शिवसेनेत जी धुसफूस सुरू झाली आहे, सरकार स्थापन होणार की नाही, अशी अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली असताना, त्यावर पवार यांनीही किंवा अन्य नेत्यांनीही कोणतेही भाष्य केले नाही.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या आधी सकाळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

या संदर्भात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काही चर्चा झाली का, असे थोरात यांना विचारले असता, राजकीय चर्चा झाली एवढेच उत्तर त्यांनी दिले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आदी नेते गुरुवारी दिल्लीला रवाना झाले. उद्या सकाळी सोनिया गांधी यांच्याशी या नेत्यांची भेट होईल.