मुंबई : शिवसेनेच्या हिंदुत्ववादी राजकारणावरून काँग्रेसचे नेते नाके मुरडत असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात काँग्रेसचे मंत्री सुनील केदार हे सहभागी झाले होते. यामुळे काँग्रेसची  पंचाईत झाली.

ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळी पशूसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार हे उपस्थित होते. केदार हे आधीच अयोध्येत दाखल झाले होते. ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यावर केदार यांना विशेष महत्त्व देण्यात आले. काँग्रेसचे मंत्री बरोबर असल्याने शिवसेनेच्या गोटातही उत्साह वाढला. यातूनच केदार यांचा उल्लेखही करण्यात आला.  केदार यांना विचारले असता त्यांनी आपण वैयक्तिक पातळीवर अयोध्येत गेलो होते. या दौऱ्याशी काँग्रेस पक्ष किंवा राज्य सरकारचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण वैयक्तिक पातळीवर अयोध्येत जाऊ शकत नाही का, असा सवालही त्यांनी केला.

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूची किंवा राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी या मुद्दय़ांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याला लोकसभेत शिवसेनेने पाठिंबा दिला असता काँग्रेसने नापसंती व्यक्त केली होती. काँग्रेसच्या नाराजीनंतर राज्यसभेत शिवसेनेने तटस्थ राहणे पसंत केले होते. शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाला काँग्रेसने नेहमीच विरोध दर्शविला. तरीही काँग्रेसचे मंत्री अयोध्येत उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने केदार यांच्या उपस्थितीबद्दल नापसंतीची भावना व्यक्त केली.