24 January 2021

News Flash

राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का? – अशोक चव्हाण

भाजप हा फेकाफेकी व घोषणांचा कारखाना असून अंमलबजावणी शून्य आहे अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातील भाजप सरकारने घोषणांशिवाय काहीही केलेले नाही. भाजप हा फेकाफेकी व घोषणांचा कारखाना असून अंमलबजावणी शून्य आहे अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते सोलापूर येथे जनसंघर्ष यात्रेतील सभेत बोलत होते.

संघर्ष यात्रेच्या पाचव्या दिवसाची सुरुवात पंढरपूर येथे महाराष्ट्राचे अराध्य दैवत विठ्ठलाचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर मंगळवेढा येथे नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. मंगळवेढा आणि सोलापूर येथे झालेल्या जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, मोदी फडणवीसांनी खोटी आश्वासने देऊन मते घेतली पण सत्तेत आल्यावर यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सोलापूरात येऊन म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे साहेबांनी गृहमंत्री असताना देशातील पोलिसांचे गणवेश सोलापूरात शिलाई करून घेतले असते तर हजारो लोकांना रोजगार मिळाला असता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊन चार वर्ष झाली केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे तरीही पोलिसांचे गणवेश सोलापूरातून का घेत नाहीत? चीन मधून कपडा आयात केल्याने व नोटबंदीमुळे या परिसरातील वस्त्रोद्योग संकटात सापडला असून हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत.

स्मार्ट सिटीच्या फक्त घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच कामे केली नाहीत त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत. सांगता येईल असे एकही काम गेल्या चार वर्षात करता आले नाही म्हणून आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून हिंदू, मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे असे चव्हाण म्हणाले.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी “बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात” आणि दुसरीकडे भाजपचे लोकच महिलांवर अत्याचार करतात. भाजपचे आमदार तरूणांना मुलगी पळवून आणण्यासाठी मदत करण्याची भाषा बोलतात. भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून भाजपने राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का? असा संतप्त सवाल करून माता भगिनींच्या सुरक्षेसाठी भाजपचे सरकार घालवावे लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतकरीविरोधी आहे. देशात मुबलक साखर उपलब्ध असतानाही सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली. देशात डाळीचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे तरीही सरकारने आफ्रिकेतून डाळ आयात केली आहे. उद्योगपतींच्या हितासाठीचे निर्णय घेऊन मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे.
राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात या सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारने सर्वच समाजघटकांची फसवणूक केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या गप्पा मारणा-यांना राज्यातले रस्तेही खड्डेमुक्त करता आले नाहीत.

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही सरकारच्या जनविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. प्रणिती शिंदे, आ. अमर काळे, आ. अमरनाथ राजूरकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस काँग्रस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2018 8:45 pm

Web Title: congress mp ashok chavan slams bjp ram kadam
Next Stories
1 ‘तो’ बारा वर्षांपूर्वी वाचला; आता त्याच मार्गावर अपघातात गेला
2 रामराजे मला गुरूंसारखे, मी त्यांना कशाला धमकावू: उदयनराजे
3 अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पिचकाऱ्यांनी रंगवलेली भिंत केली साफ
Just Now!
X