मुंबई : सनातन संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आता आक्रमक भूमिका घेतली असली, तरी सत्तेत असताना या दोन्ही पक्षांच्या सरकारने मवाळ भूमिका घेतली होती. सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता, पण कागदपत्रांची पूर्तताच करण्यात आली नव्हती.

सनातन संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादीने केला आहे. आघाडी सरकारने सनातनच्या विरोधात कारवाईस टाळाटाळच केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सनातनवर कारवाईसाठी सरकारवर दबाव आला होता. काँग्रेसचे मंत्री व आमदारांनीही कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली होती. पण तेव्हा राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याने मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जातो.

दहशतवादी कारवायांच्या आरोपांवरून तेव्हा गृह खात्याने मराठवाडा व मुंबईतील अल्पसंख्याक युवकांची धरपकड केली होती. पण सनातनच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तशा पद्धतीने कारवाई झाली नाही, असा उघडपणे आरोप काँग्रेसच्या आमदारांनी तेव्हा केला होता.

दहशतवादाच्या आरोपांवरून अल्पसंख्याक तरुणांच्या विरोधात  कारवाई करण्यात आली. सनातन संस्थेच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. पण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सनातन संस्थेच्या विरोधात कारवाई करण्याचे टाळले होते. काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळात तशी मागणी केली होती. भाजप सरकारही फार काही गंभीर दिसत नाही.

 – हुसेन दलवाई, काँग्रेस खासदार

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे कट कोणी केला याचा छडा लावणे आवश्यक आहे. पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाहक संशय व्यक्त केला जात आहे

नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते