कोल्हापूर महानगरपालिकेत पराभव, सोलापूर पाठोपाठ आता सातारा-सांगली या विधान परिषदेच्या मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत बंडाळीमुळे पराभव, एकूणच बालेकिल्ल्यातच हादरे बसू लागल्याने राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मागे फरफटत न जाण्याची काँग्रेसची खेळी मात्र यशस्वी झाली.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा स्थापनेपासूनचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची हळूहळू पिछेहाट होऊ लागली आहे. अगदी पुणे जिल्ह्य़ात केवळ तीनच आमदार निवडून आले. यानंतर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सारी प्रतिष्ठा पणाला लावूनही राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या.

विधान परिषदेच्या सोलापूर प्राधिकारी मतदारसंघातही गेल्या वर्षी अंतर्गत बंडाळीचा राष्ट्रवादीला फटका बसला. संख्याबळ असूनही पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, राष्ट्रवादीने सारे खापर हे काँग्रेसवर फोडले होते.

सातारा-सांगली मतदारसंघात राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ होते. तरीही काँग्रेसने बाजी मारली. अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करूनही राष्ट्रवादीचा पराभव झाला. अजितदादांपेक्षा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना काँग्रेस जास्त ‘जवळ’ची वाटली. साताऱ्यातील राजानेही अजितदादांना धडा शिकविण्याची संधी सोडली नाही.

राष्ट्रवादीने बोध घ्यावा

या निवडणुकीत राष्ट्रवादीने सामंजस्याची भूमिका घेतली असती तरी दोन्ही पक्षांच्या जागा वाढल्या असत्या, पण राष्ट्रवादीने भाजप वा शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली. तरीही काँग्रेसची जागा वाढली आहे. या निकालाचा राष्ट्रवादीने बोध घ्यावा.

अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष