प्रभाग समिती निवडणुकीत सेना, सपत फूट

शिवसेना आणि समाजवादी पार्टीतील अंतर्गत वादामुळे एम-पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांनाच धूळ चारली. शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट समाजवादी पार्टीच्या उमेदवाराच्या पारडय़ात मत टाकले, तर समाजवादी पार्टीच्या नगरसेविकेचे मत बाद झाले. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. याचा फायदा काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शेकापच्या एकमेव नगरसेविका खैरुन्निसा अकबर हुसेन यांना झाला आणि त्यांच्या गळ्यात प्रभाग समिती अध्यक्षपदाची माळ पडली.

या प्रभाग समितीमध्ये एकूण १३ नगरसेवक असून समाजवादी पार्टी चार, शिवसेना तीन, भाजप एक, काँग्रेस दोन शेकाप एक, भारिप एक आणि अपक्ष एक असे संख्याबळ आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगरसेविका मंजू कुमरे यांना, तर समाजवादी पार्टीने रेश्मा नेवरेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. शेकापच्या खैरुन्निसा अकबर हुसेन या काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत होत्या. निवडणुकीच्या वेळी समाजवादी पार्टीचे नगरसेवक शांताराम पाटील आणि भारिपचे नगरसेवक अरुण कांबळे अनुपस्थित होते. सपाच्या नगरसेविका नूरजहाँ रफिक यांनी आवाजी मतदानाच्या वेळी स्वपक्षाच्या उमेदवार रेश्मा नेवरेकर यांना मत दिले, पण लेखी मतदानाच्या वेळी शिवसेनेच्या उमेदवार मंजू कुमरे यांच्या पारडय़ात मत टाकले. त्यामुळे त्यांचे मत बाद झाले. मात्र शिवसेनेचे नगरसेवक दिनेश पांचाळ यांनी नेवरेकर यांच्या पारडय़ात मत टाकल्यामुळे त्यांना तीन मते मिळाली. भाजपचे एक आणि उरलेली शिवसेनेची दोन अशी तीन मते मंजू कुमरे यांना मिळाली.