मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दादर येथील स्वामिनारायण मंदिरात असलेल्या कार्यक्रमाच्या परिसरात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकत्र्यांनी इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने केली. अर्थमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून दुचाकी फेरी काढली.

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन या दादर येथे उद्योजक, अर्थतज्ज्ञ व मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याचे निमित्त साधून काँग्रेसने रविवारी सकाळीच दादर येथे आंदोलन जाहीर केले होते. त्यामुळे स्वामिनारायण मंदिर परिसर, दादर रेल्वेस्थानक आणि भाजप कार्यालय परिसरातील रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. रस्त्यांवर अडथळे उभारून ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहापासून काँग्रेस कार्यकत्र्यांनी मोर्चा काढला. त्यात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, चरर्णंसह सप्रा व अन्य नेते सहभागी झाले होते.

दादर रेल्वेस्थानकाबाहेर जमलेल्या काँग्रेस कार्यकत्र्यांनी इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या कार्यकाळात २०१४ मध्ये असलेला घरगुती गॅस सिंलेडरचा दर व आजचा दर असे फलक घेऊन कार्यकर्ते केंद्र सरकारचा निषेध करीत होते.