मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या कुख्यात गुंड करीम लाला याला भेटत होत्या, या शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्यात आणि काँग्रेसमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर राऊत यांनी आपले विधान मागे घेतले. आपल्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल आदरच आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांना इंदिराजी समजल्याच नाहीत, हे दुर्दैव असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत यांच्या फटकेबाजीमुळे शिवसेनेची पंचाईत झाली आहे.

करीम लाला हा एके काळी पठाणांचा नेता होता. त्या नात्याने इंदिराजी त्याला भेटल्या होत्या. त्यात विशेष काही नाही. इंदिराजींना समजून घेणे अवघड आहे. त्या कोणाला समजल्या नाहीत, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर ते मी मागे घेतो, असे राऊत म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेमुळे किंवा काँग्रेसच्या दबावामुळे वक्तव्य मागे घेतले का, असे विचारता माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी स्वत:हून ते मागे घेतले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, या वक्तव्यावरूनही राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यानंतर छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला आदर आहे, मात्र तंगडे तोडण्याची भाषा नको, तंगडय़ा सर्वानाच आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांना सत्तेची धुंदी चढली आहे. भावाला सत्तेत वाटा न मिळाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. महाराजांच्या वंशजांबद्दल बोलल्यास जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. मात्र, राऊत यांनी त्यावर मौन पाळले.

समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. याविषयी विचारता, पवार हे ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. इतिहासकारांनी दाखले तपासून पाहावेत, असे राऊत यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंकडून राऊत यांचा बचाव

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात गुन्हेगार करीम लाला यांच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेचे युवानेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राऊत यांचा बचाव केला आहे. राऊत यांच्या बोलण्याचा संदर्भ वेगळा होता. त्यांचा हेतू स्वच्छ होता. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबाबत वाईट बोलणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज सांगली बंद

दरम्यान, या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘शिवप्रतिष्ठान’च्या वतीने उद्या शुक्रवारी (दि. १७) सांगली बंदचे आवाहन केले आहे. याबाबत ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी म्हणाले, की महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वाना आदर आहे. त्यांच्या याच घराण्यातील थेट वंशज असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत िनदनीय वक्तव्य करीत शिवसेनेचे खा. राऊत यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा ‘शिवप्रतिष्ठान’ आपले आंदोलन आणखी तीव्र करेल असा  इशाराही भिडे गुरुजी यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री सांगली जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी इस्लामपूर येथे येत असून अद्ययावत तहसील कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे पहिल्यांदाच जिल्ह्य़ात येत असताना ‘सांगली बंद’ असल्याने पोलीस यंत्रणेचीही बंदोबस्तासाठी कसोटी लागणार आहे.