फेरीवाल्यांविरुद्ध सुरू असलेली कारवाई थांबविण्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन तयार नसल्याने आता काँग्रेसने शिवसेनेच्या शिव वडापाव गाडय़ांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या गाडय़ांजवळ काँग्रेसतर्फे अशा कांदे-पोह्य़ाच्या गाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेमध्ये शिव वडापाव आणि कांदे-पोह्य़ांचा नवा खमंग वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी शिवसेनेने शिव वडापावच्या गाडय़ा उपलब्ध केल्या आहेत. पालिकेची परवानगी नसतानाही शिव वडापावच्या सुमारे ५०० हून अधिक गाडय़ा मुंबईत अनेक ठिकाणी सुरू आहेत. पालिकेतर्फे सध्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना शिव वडापावच्या गाडय़ांना अभय देण्यात येत आहे. या अनधिकृत गाडय़ांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मुंबईमध्ये जागोजागी कांदे-पोह्य़ाच्या गाडय़ा सुरू करण्यात येतील, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी  दिला.