एम-पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी निधी शिंदे

मुंबई : काँग्रेसने विरोधी पक्षांची साथ सोडत सत्ताधाऱ्यांशी हात मिळवून आपले एकमेव मत शिवसेनेच्या पारडय़ात टाकल्यामुळे पालिकेच्या ‘एम-पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार निधी शिंदे विजयी झाल्या. काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल समाजवादी पार्टीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे पालिकेतील विरोधकांमध्ये फूट पडल्याचे उघड झाले आहे.

‘एम-पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या निवडणुकीसाठी शिवसेनेने नगरसेविका निधी शिंदे यांना, तर समाजवादी पार्टीने नगरसेवक अख्तर कुरेशी यांना उमेदवारी दिली होती. ‘एम-पूर्व’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये १५ नगरसेवक असून शिवसेना सहा, समाजवादी पार्टी पाच, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एआयएमआयएम यांचा प्रत्येकी एक नगरसेवक असे या प्रभाग समितीमध्ये बलाबल आहे. शिवसेनेला भाजपने पाठिंबा दिल्यामुळे निधी शिंदे यांची मते सातवर पोहोचली होती. तसेच समाजवादी पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस, एआयएमआयएमने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अख्तर कुरेशी यांनाही सात मते मिळणार हे स्पष्ट झाले होते. मात्र काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार हे गुलदस्त्यात होते. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी आपले मत निधी शिंदे यांच्या पारडय़ात टाकले. त्यामुळे निधी शिंदे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. निधी शिंदे यांना आठ, तर अख्तर कुरेशी यांना सात मते मिळाली.

अबू आझमी यांची टीका

पालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आहे, परंतु काँग्रेसने ‘एम-पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला मतदान करून पालिकेतील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपल्याचे दाखवून दिले, अशी टीका समाजवादी पार्टीचे आमदार अबू आसीम आझमी यांनी केली.