समितीत घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या श्रेयावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत धुसफुस सुरू झाली आहे. स्मारकासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये सर्वपक्षीयांना स्थान देण्याची मागणी करीत काँग्रेसने या वादाला तोंड फोडले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची २५० फुटांवरून ३५० फूट इतकी करण्याचा निर्णय गेल्यात आठवडय़ात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या स्मारकाचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीमध्येच चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या स्मारकाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. मात्र या भेटी होत असताना काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्याला आमंत्रित न करण्यात आल्याने पक्षात अस्वस्थता पसरली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटले. स्मारकाच्या पाहणीसाठी जाताना अन्य मंत्र्यांना कल्पना द्यावी तसेच याबाबतच्या समितीमध्ये सरकारमधील सर्व पक्षांना स्थान द्यावे अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याचे समजते.