मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळांकडून उपनगरांतील डोंगर उतारांवरील धोकादायक भागांत काम सुरू

मुंबई : पावसाळ्यात दरड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडून डोंगर उतारावरील धोकादायक भागालगत संरक्षक भिंती उभारण्यात येत असून या वर्षांत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये डोंगरांवरली धोकादायक भागात ५२ ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. तर सध्या १७९ ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. ही सर्व कामे वेगाने पूर्ण करण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आदेश मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना दिले आहेत. चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आदेश दिले आहेत.

मुंबईत पूर्व-पश्चिम मोठय़ा संख्येने डोंगराळ भाग आहे. या डोंगरांवरील उतारांवर मोठय़ा संख्येने झोपडय़ा उभ्या राहिल्या असून पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. दरड कोसळू नये म्हणून डोंगर उतारांवरील धोकादायक भागालगत मंडळाकडून संरक्षक भिंती उभारण्यात येतात. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाकडून यासाठी मंडळाला निधी उपलब्ध होतो. तर मुंबई महानगरपालिकेने तसेच आमदार-खासदार यांच्या मागणीनुसार त्या त्या ठिकाणी ही कामे केली जात. दरवर्षी यासाठी निधी मंजूर होतो. त्यानुसार चालू वर्षांसाठी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाकडून पूर्व उपनगरासाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तर पश्चिम उपनगरासाठी ३३ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर झाला. या निधीच्या माध्यमातून २०२१ वर्षांत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील २३३ ठिकाणी संरक्षक भिंतीच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी विकास रसाळ यांनी दिली.

मंजूर २३३ पैकी ५२ ठिकाणांच्या भिंतीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तर १७९ पैकी ९५ ठिकाणच्या भिंतींची कामे निविदा स्तरावर आहेत. तर ८४ ठिकाणी भिंतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. ही कामे आता शक्य तितक्या लवकर पूर्ण करत डोंगर उतारावरील झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. रविवारच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रसाळ यांनी या कामाचा आढावा घेतला.

मंडळाकडून संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरू असून आता या कामाला वेग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शक्य आहे तिथे संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. मात्र अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे संरक्षक भिंत उभारणे तांत्रिकदृष्टय़ा अशक्य आहे. अशा ठिकाणच्या झोपडय़ा हटवणे हाच पर्याय आहे. त्यानुसार सातत्याने पालिकेला अशा ठिकाणच्या झोपडय़ा हटवण्यासाठी सूचना करत आहोत. पण अजूनही अनेक ठिकाणी झोपडय़ा उभ्याच आहेत.  पुन्हा एकदा पालिकेला अशा झोपडय़ा हटवण्याची विनंती करू. जेणेकरून जीवितहानी टाळता येईल.

– विकास रसाळ, मुख्य अधिकारी, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, म्हाडा