मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नुकत्याच संमत झालेल्या परिवहन सेवेच्या कंत्राटाला विरोध न करण्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांना २५ लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

महानगरपालिकेची सेवा चालविण्यासाठी कंत्राटदार नेमण्याच्या निविदेला स्थायी समितीने गेल्या आठवडय़ात मान्यता दिली. निविदेचा हा प्रस्ताव प्रशासनाने अत्यंत घाईगडबडीने आणल्याने यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्या वेळी करून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत विरोध केला. मात्र शिवसेना आणि विरोधी पक्षाचे सदस्य या विषयावर एकत्र आल्याने भाजपचा विरोध असूनही निविदा मंजूर झाली. त्यामुळे शामा शाम सव्‍‌र्हिसेस या कंत्राटदाराला ही निविदा प्राप्त झाली. मात्र या निविदेमुळे महापालिकेचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याने निविदा मंजुरीचा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी शासनाकडे दाद मागण्यात येणार असल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीर केले होते.

त्याचवेळी कंत्राटदाराच्या वतीने राधेशाम कुथारिया याने आपल्याशी संपर्क साधला आणि निविदेला विरोध न करण्याची विनंती करून २५ लाख रुपयांची ऑफर दिली. याबाबतची तक्रार २९ जूनला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली.  कंत्राटदाराने आपल्याशी केलेले संभाषण या विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केले. त्यात इतर सर्वाना पैसे देण्यात आल्याचे कुथारिया याने स्पष्टपणे सांगितले, अशी माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.

त्यानंतर या विभागाने सापळा रचला होता. कुथारिया शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास नरेंद्र मेहता यांच्या कार्यालयात २५ लाख रुपये घेऊन आला. त्या वेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या अटकेमुळे निविदेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली.