कंत्राटदाराचा नवा प्रताप; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सांडपाणी आणि मलवाहिन्यांमधून उपसलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याऐवजी कंत्राटदाराने तो चक्क चेंबूर येथील पालिकेच्याच मुख्य वाहिनी कार्यालयाच्या आवारात टाकला असून आता या कार्यालयाच्या आवारात गाळाचे ढीग साचू लागले आहेत. परिणामी, कर्मचारी-कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ लागला आहे. नालेसफाई, रस्तेनिर्मिती कामांप्रमाणेच आता सांडपाणी, मलवाहिन्यांतील गाळ टाकण्याच्या कामातही घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची चक्क कर्मचाऱ्यांकडूनच मागणी करण्यात येऊ लागली आहे.
पूर्व उपनगरांमध्ये सांडपाणी, मलवाहिन्यांतील गाळ काढण्याची कामे करण्यासाठी पालिकेने चेंबूर, कुर्ला आणि घाटकोपर येथे मुख्य वाहिनी कार्यालये सुरू केली आहेत. पूर्वी या कार्यालयांतील कामगारांमार्फत त्या त्या परिसरातील तुंबणाऱ्या सांडपाणी, मलवाहिन्या साफ केल्या जात होत्या. लोकसंख्या आणि इमारतींची संख्या वाढू लागली. त्याचबरोबर कामाची व्याप्ती वाढल्याने सुमारे १५ वर्षांपूर्वी पालिकेने ही कामे कंत्राटदाराकडे सोपविण्यास सुरुवात केली. सुरुवातीची वर्षे कंत्राटदारांनी इमानेइतबारे कामे केली. मात्र गेल्या काही वर्षांपासून या कामांमध्येही ढिसाळपणा होऊ लागला आहे. परिणामी, पूर्व उपनगरांमध्ये सांडपाणी, मलवाहिन्या तुंबण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तसेच काही ठिकाणी मॅनहोलमधून ओघळणारे घाणेरडय़ा पाण्याचे पाट चुकवत नागरिकांना चालावे लागत आहे.
देवनार, कांजूर, मुलुंड कचराभूमीचा प्रश्न गंभीर बनला असून कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी मढ येथील कचराभूमीमध्ये गटारे, मलवाहिन्या, नाल्यांतून काढलेला गाळ टाकण्यात येत होता. मात्र क्षमता संपुष्टात आल्याने ही कचराभूमी बंद करावी लागली. आता गटारे, नाल्यांतील गाळ टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. चेंबूर परिसरातील सांडपाणी, मलवाहिन्यांतील गाळ काढणाऱ्या कंत्राटदाराला सफाईसोबत काळाची विल्हेवाट लावण्याचेही काम सोपविण्यात आले होते. मढ अथवा अन्य ठिकाणच्या कचराभूमींमध्ये गाळ टाकण्यास जागा नसल्याने कंत्राटदाराने नवी नामी शक्कल लढविली. काढलेला गाळ चक्का चेंबूर येथील पालिकेच्या मुख्य वाहिनी कार्यालयाच्या आवारातच टाकून दिला. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आलेल्या गाळाबाबत एकाही अधिकाऱ्याने आक्षेप घेतला नाही. या दरुगधीयुक्त गाळामुळे कामगार-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. पण त्याची ना प्रशासनाला खंत ना सत्ताधारी शिवसेना-भाजपला.
नालेसफाईत उपसलेला गाळ वाहून नेण्याच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर रस्ते कामांमध्ये डेब्रिज वाहून नेण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दस्तुरखुद्द महापौरांनी केला होता. तसेच महापौरांच्या मागणीनुसार पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रस्ते कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता सांडपाणी, मलवाहिन्यांतील गाळ टाकण्यात झालेल्या घोटाळ्याची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी कामगारांकडूनच करण्यात येत आहे.

सांडपाणी, मलवाहिन्यांतून उपसलेला गाळाची कंत्राटदारानेच विल्हेवाट लावायला हवी होती. तसे न करता त्याने तो गाळ पालिका कार्यालयाच्याच आवारात टाकला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचा संशय आहे. अन्यथा पालिक कार्यालयात गाळ कसा काय टाकला गेला असता. या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात पालिका मुख्यालयाच्या आवारातही ही मंडळी असाच प्रकार करतील.
सुनील चिटणीस, कार्याध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना