अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘कयार’ या अति तीव्र चक्रीवादळाचे रूपांतर महाचक्रीवादळात (सुपर सायक्लोन) झाले असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. रविवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबईपासून ५८० किमीवर असताना अति तीव्र चक्रीवादळाचे रूपांतर महाचक्रीवादळात झाले. महाचक्रीवादळाचा पुढील प्रवास ओमानच्या दिशेने सुरू राहणार आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर शुक्रवारी चक्रीवादळात झाले होते. त्यानंतर शनिवारी या वादळाने अति तीव्र स्वरूप धारण केल्यानंतर रविवारी त्याचे रूपांतर महाचक्रीवादळात झाले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत अशी आठ महाचक्रीवादळे हिंदी महासागराच्या उत्तरेस झाली असून, कयार हे नववे महाचक्रीवादळ आहे. यापूर्वी २००७ मध्ये गोणू या महाचक्रीवादळाचा फटका भारताला बसला होता.

पाऊस थांबण्याची शक्यता

महाचक्रीवादळाचा प्रवास ओमानच्या दिशेने सुरू झाल्याने राज्यातील पाऊस थांबण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील तीन दिवसांत राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह किरकोळ सरी पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार ३१ ऑक्टोबपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून त्यानंतर पाऊस ओसरेल.