शैलजा तिवले

करोना संसर्गामुळे रक्त गोठल्यामुळे मेंदू, हृदय, हात-पाय, पोट यासोबतच आता दृष्टीपटलाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. आत्तापर्यंत आठ रुग्णांमध्ये डोळ्याच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या (थ्रोम्बोसिस) झाल्याचे आढळले. त्यामुळे करोनातून बरे झाल्यानंतरही शरीरात होणारे बदल वेळीच ओळखून पुनर्तपासण्या होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

हाता-पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्यास तो भाग सडतो (गँगरिन), हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. यासह पोटामधील रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्याच्या घटनांची नोंद आहे. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या झाल्याने आतापर्यंत २८ जणांना अर्धागवायूचा झटका आला. आता डोळ्यांच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्याचे तपासण्यांतून निदर्शनास आले. करोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास शरीराच्या कोणत्याही भागातील रक्तवाहिनींवर याचे दुष्परिणाम दिसतात, असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

रक्त गोठण्याचे निदान करण्यासाठी ‘डी-डायमर’ चाचणी अचूक आहे, असे म्हणता येणार नाही. कारण करोनाबाधित बहुतांश रुग्णांमध्ये ही चाचणी केल्यास कमी-अधिक प्रमाणात रक्त गोठल्याचे दाखवितेच. त्यामुळे सरसकट सर्वच रुग्णांना औषधे सुरू करणे शारीरिकदृष्टय़ा योग्य नाही, असे राज्याच्या विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी स्पष्ट केले. करोनाबाधित रुग्णांना रक्त गोठल्यामुळे होणाऱ्या विकारांचा धोका असल्याने आवश्यकता असलेल्या रुग्णांना रक्त पातळ होण्यासाठी दिली जाणारी औषधे महिनाभरापर्यंत सुरू ठेवावीत, अशा सूचना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये जूनमध्येच दिल्या आहेत. यानंतर भारतीय संशोधन परिषदेनेही (आयसीएमआर) या औषधांचा वापर करण्याबाबत नियमावलीत बदल केल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.

तपासणी गरजेची..

करोनामुक्त झालेल्या रुग्णांना वरवर कोणताही त्रास जाणवत नसला तरी १४ आणि २८ दिवसांनी पुनर्तपासण्या होणे आवश्यक आहे. त्यातूनच रक्तात गुठळ्या निर्माण झाल्याने होणारे संभाव्य धोके किंवा शरीरात होणाऱ्या अन्य बदलांचे निदान करून उपचार  शक्य आहे. यात आता डोळ्यांच्या तपासणीचाही समावेश करणे गरजेचे असल्याचे डॉ. राहुल पंडित यांनी अधोरेखित केले.

पूर्ण बरे झाल्यानंतरच..

६० वर्षांवरील आणि अन्य आजार असलेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्याशिवाय किंवा १४ दिवसांच्या आधी घरी पाठवू नये. घरी पाठविण्याआधी फुप्फुसाशी संबंधित आणि अन्य चाचण्या करून प्रकृती स्थिर असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. संसर्ग झाल्यानंतर २५ ते ३० दिवसांनी मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६ टक्के आहे. यामध्ये रक्त गोठल्याने होणारे आजार, उत्तेजक (स्टिरॉईड) किंवा अन्य औषधांच्या अतिवापर किंवा जिवाणूजन्य आजार ही प्रमुख कारणे आहेत, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

झाले काय?

* मुलुंडमधील ५२ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीला सात दिवसांत घरी सोडण्यात आले. त्यानंतर चारच दिवसांनी त्यांना डाव्या डोळ्याने अंधूक दिसू लागले.

* डोळ्याच्या पडद्यावरील एका रक्तवाहिनीला सूज आल्याचे चाचण्यांमध्ये समजले.

* करोना संसर्गानंतर रक्त गोठल्याने त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे, असे सूर्या नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉ. विनोद गोयल यांनी सांगितले.

* वेळेत निदान झाल्यामुळे उपचारांनंतर या रुग्णाची १०० टक्के दृष्टी परत आल्याचे रुग्णालयातील डॉ. जय शेठ आणि डॉ. जय  गोयल यांनी स्पष्ट केले.

रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर काही दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही नोंदण्यात आल्या आहेत. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर काही लक्षणे जाणवतात. परंतु या आजाराविषयी मनात असलेल्या भीतीनेही रुग्ण पुन्हा तपासणीसाठी येत नाही. परिणामी आजाराचे स्वरूप वाढत जाते. तेव्हा करोनामुक्त रुग्णांनी छोटय़ा लक्षणांकडेही दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

– डॉ. अविनाश सुपे, मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख