राज्यात वीजपुरवठ्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या महानिर्मिती, महापारेषण, महावितरण या सरकारी वीज कंपन्यांच्या ६ अधिकाऱ्यांचा गेल्या तीन दिवसांत करोनामुळे मृत्यू झाल्याने वीज

कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांत घबराट पसरली आहे. वीजपुरवठ्याशी निगडित विविध कामांसाठी लोकांमध्ये जाऊन काम करावे लागत असल्याने वीज कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्याची मागणी केली आहे.

ठाण्यातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशिकांत ठाकरे, शहाद्यातील कार्यकारी अभियंता किसन पावरा, कळवणमधील कार्यकारी अभियंंता सुरेंद्रनाथ भोये या तिघांचा गुरुवारी करोनामुळे मृत्यू झाला. तर डोंबिवलीतील साहाय्यक अभियंता राजेश चिंचखडे, धुळ्यातील सहायक अभियंता कपिल सानप, खापरखेडा येथील कनिष्ठ अभियंता नितेश वांगडकर यांचा गेल्या तीन दिवसांत मृत्यू झाला.

दरम्यान मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचेही करोनाने निधन झाले आहे. अखलाख अहमद पटेल (५६) असे त्यांचे नाव आहे. ते डी. एन. नगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते.