१० हजार १९७ नागरिकांच्या तपासणीचा निष्कर्ष

मुंबई: कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित शास्त्रीय माहिती उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची तिसरी सेरो चाचणी करण्यात आली. नमुना निवड पद्धतीचा वापर करून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली असून यापैकी ३६.३० टक्के  नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. झोपडपट्टीच्या तुलनेने बिगरझोपडपट्टी परिसरांमधून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये प्रतिपिंड आढळण्याचे प्रमाण जास्त आहे.

जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पहिले सेरो सर्वेक्षणात बिगरझोपडपट्टी परिसरात प्रतिपिंडे आढळण्याचे प्रमाण १८ टक्के  होते. ऑगस्टमध्ये यात दोन टक्क्यांनी वाढ झालेली दिसली, तर नुकत्याच केलेल्या तिसऱ्या सर्वेक्षणात ते प्रमाण २८.५ इतके वाढल्याचे दिसून आले.

तर झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण पहिल्या सर्वेक्षणात ५७ टक्के , तर दुसऱ्या सर्वेक्षणात ४५ टक्के  होते, जे तिसऱ्या सर्वेक्षणात ४ टक्क्यांनी घसरून ४१.६ टक्के  लोकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली. या सर्वेक्षणात महापालिका दवाखाने आणि खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्त नमुन्याची चाचणी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे लसीकरण न झालेल्या लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार ३५.०२ टक्के  पुरुषांमध्ये, तर ३७.१२ टक्के  स्त्रियांमध्ये प्रतिपिंडे आढळली.