केरळमध्ये आखाती देशातून येणारे प्रवासी आणि करोनाची वाढती संख्या यांचा विचार करून तेथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान सह आता केरळमधून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या राज्यांमधून येणाऱ्यांना करोना चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव संजय कुमार यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भातील बाधितांच्या वाढत्या संख्येने सरकारची चिंता वाढलेली असतानाच महानगर प्रदेशातही उपनगरीय रेल्वे सेवा सर्वासाठी सुरू झाल्यापासून करोना बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. आखाती देशातील लोक थेट केरळमध्ये येऊन मग राज्यात येत असल्याने करोनाचा पुन्हा संसर्ग वाढण्याती शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने २५ नोव्हेंबर पासून दिल्लीसह, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध लागू के ले आहेत. आता केरळमधून विमान, रेल्वे अथवा रस्तेमार्गे येणाऱ्यांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखविल्याशिवाय राज्यात प्रवेश दिला जाणार नाही.