गोरेगावच्या नेस्को करोना उपचार केंद्रात संशोधन

मुंबई : भविष्यात आवाजावरून करोनाची चाचणी करणे शक्य व्हावे यासाठी गोरेगावच्या नेस्को करोना उपचार केंद्रात १ सप्टेंबरपासून संशोधनाला सुरुवात होणार आहे. इस्रायलमधील एका कंपनीच्या सहकार्याने पालिका २००० करोना रुग्णांच्या आवाजाचा अभ्यास करणार आहे. यात यश आल्यास ३० सेकंदांत आवाजावरून करोना चाचणी करणे शक्य होईल.

इस्रायलमधील वोकालिस्ट हेल्थकेअर कंपनीच्या सहकार्याने मुंबईत प्रथमच या प्रकारचे संशोधन होत आहे. त्याकरिता मान्यता घेण्यात आल्या असून कंपनीशी करार करण्यात आल्याचे नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंड्राडे यांनी सांगितले. मंगळवारपासून कंपनीने दिलेल्या टॅबवर करोना रुग्णांचे आवाज संकलित केले जातील.

एखाद्याच्या आवाजातील बदलांवरून त्याला करोना आहे का किंवा किती गंभीर स्वरूपाचा संसर्ग त्याला झाला आहे, हे शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न जगभरात होत आहे. अमेरिका आणि इस्रायलमध्ये या प्रकारचे संशोधन सुरू आहे. कं पनीतर्फे  पालिकेच्या डॉक्टरांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असून मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात होईल.

चाचणी कशी करणार?

करोना संसर्गामध्ये घशाला आणि फुप्फुसाला सूज येते. त्यामुळे आवाजावर आणि उच्छ्वासावर परिणाम होतो. हा परिणाम बोलण्यातून जाणवतो. आवाजाचे नमुने संगणकाला देऊन त्याद्वारे निष्कर्ष काढण्याचे हे तंत्रज्ञान विकसित केले जाणार असल्याची माहिती डॉ. आंड्राडे यांनी दिली. सुरुवातीला ५०० रुग्णांचे आवाजाचे नमुने आणि वैद्यकीय अहवाल संगणकात नोंद केले जातील. त्यानुसार रुग्णाची स्थिती किती गंभीर आहे हे पाहिले जाईल. नंतरच्या दीड हजार रुग्णांमध्ये केवळ आवाजाचे नमुने देऊन संगणकाच्या माध्यमातून निष्कर्ष काढला जाईल, असे डॉ. आंड्राडे यांनी सांगितले.

चार भाषांमध्ये संशोधन

रुग्णांना हिंदी, इंग्लिश, मराठी किंवा गुजराती या चारपैकी एका भाषेत २० अंक मोजायचे आहेत. त्यांचा आवाज आणि त्यांच्या खोकल्याचा आवाज या टॅबमध्ये संकलित केला जाणार आहे. प्रत्येक भाषेत शब्द वेगवेगळे असतात. त्यामुळे भारतीय भाषांमधील आवाज संकलित केले जाणार आहेत.  हे संशोधन यशस्वी झाल्यास आवाजावरून तीस सेकंदांत करोनाची चाचणी होऊ शकेल. मॉल, जिम, शाळा, चित्रपटगृह, उपाहारगृह अशा ठिकाणी लोकांच्या तपासणीसाठी हे तंत्रज्ञान वापरता येईल.