|| इंद्रायणी नार्वेकर

पहिल्या चार महिन्यांतच एकूण तरतुदीच्या ५० टक्के खर्च; पाच वर्षांच्या तुलनेत यंदा खर्च वाढण्याची चिन्हे

 

मुंबई: करोनाशी लढण्यासाठी मुंबई महापालिकेला गेल्या चार महिन्यातच तब्बल ६५० कोटींचा खर्च आला असून संपूर्ण वर्षभरासाठी केलेल्या एकूण भांडवली तरतूदीच्या ५० टक्के तरतूद आतापर्यंत खर्च झाली आहे. गेल्या संपूर्ण वर्षांत जेवढा खर्च झाला तेवढा खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आरोग्य विभागाशी संबंधित विकासकामांवर होण्याची शक्यता आहे.

एका छोटय़ा महानगरपालिकेच्या संपूर्ण अर्थसंकल्पाचे आकारमान जेवढे असते तेवढी तरतूद म्हणजेच साधारण तीन हजार कोटी दरवर्षी मुंबई महापालिक  आरोग्य विभागासठी करत असते. यापैकी काही ठराविक भांडवली तरतूद आरोग्य विभागाशी संबंधित विकासकामांकरीता राखीव असते. २०२०—२१ या कालावधीसाठी पालिकेने ४,२६० कोटींची एकूण तरतूद केली होती. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल १४ टक्कय़ांनी तरतूद वाढवण्यात आली होती. त्यातील १,०४९ कोटी भांडवली कामांसाठी आहेत. त्यापैकी ६५० कोटींपेक्षा अधिक रक्कम गेल्या चार महिन्यात खर्च झाली आहे. महसूली खर्चासाठी ३,२०० कोटींची तरतूद असली तरी त्यात आस्थापना खर्चाचा भाग अधिक असतो.

भांडवली खर्चातून दरवर्षी नवीन रुग्णालयांचे काम पूर्ण करणे, रुग्णालयांची दुरुस्ती, वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत करणे, नवनवीन यंत्र सामुग्री घेणे आदी विकास कामे केली जातात. परंतु, यावर्षी करोनासारखे अभूतपूर्व संकट आल्यामुळे आरोग्य विभागाला हा खर्च पीपीई कीट, नवनवीन औषधे, शवपिशव्या, व्हेंटीलेटर, करोना उपचार केंद्र स्थापन करणे, कस्तुरबा रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा उभारणे, आरोग्य विभागातील भरती, कंत्राटी कामगार नेमणे अशा विविध गोष्टींवर करावा लागला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विकासकामांवर परिणाम

या आर्थिक वर्षांत पालिकेने विविध विकासकामे हाती घेतली होती. त्यात उपनगरी रुग्णालयांचे बळकटीकरण,  मॉडय़ुलर शष्टद्धr(२२९क्रिया गृह उभारणे, प्राण्याचे रुग्णालय उभारणे, वैद्यकीय विद्यार्थ्यांंसाठी वसतिगृह उभारणे, वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत करणे अशा विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षांतील भांडवली खर्च

मुंबई महापालिका आरोग्य विभागातील विकासकामांसाठी दरवर्षी भरघोस तरतूद करीत असली तरी या तरतूदी दरवर्षी खर्च होत नाहीत. यावर्षी मात्र करोनामुळे आरोग्य विभागाचे गणित पार बिघडणार आहे.

१ रुपया उत्पन्न आणि बारा रुपये खर्च

आरोग्य विभाग हा असा विभाग आहे जिथे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. आरोग्य विभागाला दरवर्षी केसपेपरमधून अतिशय तुटपुंजे उत्पन्न मिळते. याउलट या प्रक्रियेसाठी पालिकेचे जास्त पैसे खर्च होतात. सध्या करोना काळात  केसपेपर काढण्याची पद्धत तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

४२६०.३४ कोटी – पालिकेचा आरोग्य अर्थसंकल्प

३२११.२७ कोटी – महसूली खर्चासाठी

१०४९.०७ कोटी – भांडवली खर्चासाठी

 

मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये सापडला आणि आरोग्य विभागाची करोनाशी लढाई सुरू झाली. योगायोग म्हणजे एप्रिलपासून आपले आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे या तरतूदी आपल्याला पुढच्या मार्चपर्यंत वापरता येणार आहेत. मात्र सप्टेंबरमध्ये आढावा घेऊन निधी कमी पडल्यास आम्हाला तो महापालिकेकडे मागावा लागेल.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त