महिनाभरात दैनंदिन रुग्णसंख्येत ४० टक्क्यांची घट; ‘लागणदर’ही १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांखाली

मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यभर थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा देशाच्या आर्थिक राजधानीतील प्रभाव काहीसा कमी होऊ लागला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्येची सर्वोच्च पातळी गाठणाऱ्या करोनाचा आलेख महिना संपेस्तोवर खाली आला आहे. करोनाचा लागणदर (पॉझिटिव्हिटी रेट) १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांखाली गेला असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाधितांच्या दैनंदिन संख्येतही ४० टक्क्यांची घट झाली आहे. रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, अजूनही कृत्रिम श्वसन यंत्रणा, अतिदक्षता खाटा यांच्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत करोनाचा आलेख कळस गाठत होता. त्या आठवड्यात सुमारे ७० हजार रुग्णांची नव्याने भर पडली, तर दर दिवशीच्या रुग्णांची संख्या जवळपास १० ते ११ हजारांवर गेली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा आलेख थोडासा कमी झाला आणि हे प्रमाण सुमारे ६१ हजारांपर्यंत खाली आले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तर बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली असून ३० हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ही चार ते पाच हजारांपर्यंत खाली आली आहे.

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात दरदिवशी सरासरी ४० हजार चाचण्या केल्या गेल्या आणि या वेळी बाधितांचे प्रमाण सरासरी १५ टक्के होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे प्रमाण आणखी कमी झाले असून जवळपास १३ ते १४ टक्के आढळले. शुक्रवारी

आणि शनिवारी तर यात मोठी घट नोंदली गेली. सध्या बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

चाचण्यांत लक्षणीय घट

फेब्रुवारी आणि मार्च या काळात दरदिवशी सरासरी २४,५०० चाचण्या केल्या जात होत्या. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर एप्रिलमध्ये पालिकेने चाचण्यांची संख्या दुपटीने वाढविली. एप्रिलमध्ये एका दिवसात ५६ हजार चाचण्या केल्या गेल्या. एप्रिलमध्ये सरासरी ४४ हजार चाचण्या दर दिवशी झाल्या. त्यामुळे बाधितांच्या प्रमाणात घट झाली. परंतु गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या ५० हजारांपासून २८ हजारांपर्यंत खाली आली आहे. तेव्हा ही संख्या पुन्हा वाढवून सरासरी दरदिवशी ४० हजारांपर्यंत नेणे गरजेचे आहे. तेव्हा नागरिकांनी पुढे येऊन चाचण्या करण्याचे आवाहन पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी जनतेला केले आहे.

मृत्यूंच्या संख्येत वाढ

बाधितांच्या संख्येत मोठी घट होत असली तरी मृतांचे प्रमाण मात्र झपाट्याने वाढत आहे. आठवड्याचा मृत्यूदर ०.८० टक्क्यांवरून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दीड टक्क्यांवर गेला आहे. तसेच दरदिवशीच्या मृतांची संख्या जवळपास ९० वर गेली आहे.

५४,९०,२४१ – मुंबईत आजवर झालेल्या एकूण चाचण्या

३,९२,१६० – मुंबईत प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण

८,९०,१७६ – दिल्लीत प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण

९,०१,३१४ – बेंगळूरुत प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण

खाटांचा पेच कायम

बाधितांची संख्या कमी झाल्याने सर्वसाधारण खाटांची चणचण कमी झाली आहे, परंतु गंभीर असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग तसेच कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा अजूनही अपुऱ्याच पडत आहेत.