|| प्रसाद रावकर

मुंबई महापालिकेचा निर्णय, उपचारांसाठी खास आराखडा

मुंबई : आगामी काळात लहान मुलांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने कृतिदलाच्या मदतीने नऊ वर्षांपर्यंतच्या आणि १० ते १९ वर्षांच्या मुलांसाठी नवी स्वतंत्र नियमावली आणि कार्यपद्धतीचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो करोना केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात येणार असून तेथे बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली बाधित मुलांवर उपचार करण्यात येणार आहेत.

मुंबईत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधितांमध्ये नऊ वर्षांच्या आतील ११ हजार १४४ बालकांचा समावेश असून त्यातील १७ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते २० वर्ष वयोगटातील २८ हजार ८६९ जण बाधित झाले आहेत. त्यातील ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. आगामी काळात लहान मुलांना करोनाची बाधा झाली तर आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार कृतिदलाची मदत घेऊन लहान मुलांच्या विलगीकरणाबाबतचा मसुदा तयार करण्यात येत आहे. संसर्ग झालेली बालके आणि लहान मुलांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

सध्या बाधित मुलांसाठी स्वतंत्र नियमावली नाही. संसर्ग झालेल्या मुलांना काही जम्बो करोना केंद्रात वेगळे ठेवण्यात येत आहे. मात्र आता लहान मुलांना करोनाची बाधा होऊ लागल्यामुळे त्यांच्यासाठी नव्या नियमावलीची गरज भासत आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

 समस्या आणि उपाय

सध्या बाळ आणि त्याच्या मातेला करोनाचा संसर्ग झाल्यास त्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवण्यात येते. गरजेनुसार काही वेळापुरतेच मातेजवळ बाळाला ठेवले जाते. या दोघांपैकी एकाला संसर्ग झाला असेल तरीही अशीच काळजी घेण्यात येत आहे. परंतु ९ वर्षांच्या आतील बाधित बालकांना विलगीकरणात ठेवण्यात अडचणी येतात. काही मुले पालकांशिवाय राहू शकत नाहीत. त्या दृष्टीने विलगीकरणाबाबत नव्या नियमावलीत विचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर १० ते २० वर्षांच्या करोनाबाधित मुलांसाठी नव्या जम्बो केंद्रांमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. तेथे केवळ समवयस्क मुलेच असतील. तसेच बालरोगतज्ज्ञांची तेथे नेमणूक करण्यात येणार आहे. लहान मुलांची उपचार पद्धतीही निश्चित करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भविष्यात लहान मुलांना करोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार कृतिदलातील सदस्यांच्या मदतीने करोनाबाधित लहान मुलांसाठी नवी कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे. – सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त