22 October 2020

News Flash

शिक्षण विभागाला उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाच्या सूचना

११ वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबविण्याचे उद्धव ठाकरेंचे निर्देश

शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाइन माध्यमांचे पायलट प्रोजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे सोमवारी त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो याचे प्रात्यक्षिक पाहिले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांनादेखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सूचना मागवाव्यात असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेतली. यावेळी शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर सुसंगतता असावी तसेच तो सहजरीत्या ऑफलाईन देखील उपलब्ध झाला पाहिजे हे पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांनी गुगल मीटवरील एका ऑनलाइन वर्गाचेदेखील प्रात्यक्षिक पाहिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये तसेच त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी असेही ते म्हणाले.

जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे सुधा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडेदेखील दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

१०, १२ वी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, “यंदा मार्च २० च्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर करोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते, मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू असे सांगितले. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे”. अशी माहिती दिली.

११ वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा
दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाइन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 7:26 pm

Web Title: coronaivrus lockdown maharashtra cm uddhav thackeray video conference with educcation ministry sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करोनामुक्त, आज मिळाला डिस्चार्ज
2 शिवाजी पार्क स्मशानभूमीत बाहेरील करोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नागरिकांचा विरोध
3 सेंट जॉर्जमधील अंध करोना योद्धा राजू चव्हाणचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
Just Now!
X