करोनाचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसलेल्या मुंबई महापालिकेने रुग्णालयांवर येणारा ताण हलका करण्यासाठी आता मुंबईकरांच्या घरीच जाऊन करोनाविषयक चाचणी करण्यासाठी पाच खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिली आहे. सबर्बन डायग्नोस्टिक्स, थायरोकेअर, मेट्रोपोलीस, सर एच एन रिलायन्स, एसआरएल लॅब या पाच खासगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली असून नागरिकांनी संपर्क साधताच त्यांच्या घरी जाऊन करोनाविषयक चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना शुल्क मोजावे लागणार आहे.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या वाढत असून करोनाविषयक चाचणी करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे रुग्णालयावर ताण येऊ लागला आहे. सध्या मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबईकरांची घरी जाऊन करोनाविषयक चाचणी करणे शक्य व्हावे यासाठी पालिकेने गेल्या काही दिवसांपासून खासही प्रयोगशाळांबरोबर चर्चा सुरू केली होती. त्यास सबर्बन डायग्नोस्टिक्स, थायरोकेअर, मेट्रोपोलीस, सर एच एन रिलायन्स, एसआरएल लॅब या पाच प्रयोगशाळांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

साडचार हजार रुपये शुल्क

या पाचही प्रयोगशाळांनी आपले तज्ज्ञ घरोघरी पाठवून करोनाविषयक चाचणी करण्याची तयारी दर्शविली आहे. नागरिकांनी संपर्क साधताच या प्रयोगशाळांमधील तज्ज्ञ संबंधितांच्या घरी पोहोचतील आणि त्यांची चाचणी करतील. शासनाच्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना एका चाचणीसाठी जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये शुल्क आकारता येणार आहे.

‘यांनी’ चाचणी  करून घ्यावी

ही चाचणी करण्यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचे शिफारसपत्र आवश्यक आहे. हे पत्र नागरिकांना त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडून घेता येईल. दमा, श्वसनाचे आजार, निमोनिया, ताप, थंडी, खोकला यासारख्या बाबी असलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही चाचणी करुन घेण्यास हरकत नाही.

खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांचे संपर्क क्रमांक

• सबर्बन डायग्नोस्टिक्स : ०२२—६१७०००१९

• थायरोकेअर : ९७०२४६६३३३

• मेट्रोपोलीस: ८४२२८०१८०१

• सर एच एन रिलायन्स : ९८२००४३९६६

• एसआरएल लॅब : नंबर उपलब्ध नाही