*  पोल्ट्री व्यावसायिकांचा सावध पवित्रा *  पुरवठा घटल्याने चिकनचे दर वाढणार

मुंबई : करोना विषाणूचा चिकन आणि अंडीमार्फत प्रसार होत असल्याच्या अफवा वेगाने पसरत चालल्या असून त्याचा परिणाम कोंबडीविक्रीत घट होण्यात झाला आहे. याचा धसका पोल्ट्री व्यावसायिकांनीही घेतला असून आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी त्यांनी उत्पादन कमी केले आहे. परिणामी कोंबडय़ांची आवक कमी होऊन चिकनच्या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

चिकनमधून करोना विषाणूची लागण होते अशा अफवा समाजमाध्यमातून पसरल्याने चिकन खाणाऱ्यांनी आपला मोह आवरला आहे. याचा परिणाम कोंबडी व्यवसायावर दिसून आला आहे. गेल्या तीन आठवडय़ात देशपातळीवर या व्यवसायाला सुमारे १३०० कोटी रुपयांचा फटका बसला. देशभरात दररोज ६० तर महाराष्ट्रात १२ कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कोंबडय़ांची विक्री जवळपास निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांचा माल विक्रीविना पडून आहे. अंडय़ांच्या विक्रीतही देशपातळीवर १० टक्क्य़ांची घट झाल्याचे राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी उत्पादन कमी केले आहे.

कोंबडय़ांची वाढ होऊन ती विक्रीला येण्यास ४० ते ४५ दिवस लागतात. तोपर्यंत जवळपास ६५ रुपये खर्च येतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा विक्रीदर कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रति किलोमागे ३० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. बाजारात मागणी नसल्याने व्यापारीही शेतकऱ्यांकडून माल घेण्याची तयारी दाखवत नाहीत. परिणामी ४५ दिवसांमध्ये बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या कोंबडय़ा ५२ दिवस उलटल्यावरही पोल्ट्री हाऊसमध्ये पडून आहेत, असे दीपक शितोळे या शेतकऱ्याने सांगितले. दरदिवशी प्रत्येक कोंबडीमागे जवळपास साडेचार रुपयांचा अधिकचा खर्च त्यांना सहन करावा लागतो.

‘सध्या चिकनच्या विक्रीत ४० टक्क्य़ांची घट आहे. विक्रीत घट झाल्याने चिकन दर घसरले असून त्यामुळे प्रति किलोमागे ३० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे,’ राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष एम. बी. देसाई यांनी सांगितले. चिकनची मागणी घटल्याने दर कमालीचे खालावले आहेत. मात्र चिकनला मागणी वाढली तर काही काळ तरी उत्पादन पुरेसे नसल्याने दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनंदिन विक्रीत दोन हजार टनांची घट

राज्यात दरदिवशी ३ ते ३.५ हजार टन चिकनची विक्री होते. मात्र समाजमाध्यमांवरील अफवांमुळे मागणी घटून हे प्रमाण दरदिवशी दीड हजार टनांपर्यंत खाली आले आहे. काही प्रमाणात अफवांचे निरसन झाल्याने बाजार थोडाफार सावरला आहे. मात्र बाजार पूर्वपदावर यायला आणखी एक ते दोन आठवडय़ांचा कालावधी जाईल, असे विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी सांगितले.