ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांत सापडलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पाश्र्वभूमीवर राज्यात ५ जानेवारीपर्यंत लागू करण्यात आलेली रात्रीची संचारबंदी बुधवारपासून मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यातील करोनास्थिती सध्या नियंत्रणात असल्याने रात्रीची संचारबंदी वाढविण्यात येणार नसली तरी उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांसाठी खुली होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नगरपालिका हद्द, निमशहरे तसेच ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार संचारबंदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या या निर्णयाची मुदत उद्या मंगळवारी संपत आहे. मात्र राज्यातील करोनास्थिती आता नियंत्रणात असल्याने ही मुदत वाढविण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार नसल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांने दिले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय उद्या होईल.

उपनगरीय रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याबाबत सरकारवरील दबाव वाढत असला तरी सध्या करोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. नवा विषाणू अधिक घातक असून त्याचा प्रसार फार झपाटय़ाने होत आहे. शिवाय महानगर प्रदेशात अजूनही करोना बाधित आढळून येत आहेत. सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची मुभा दिल्यास गर्दी वाढेल. त्यातून करोनाची साथ पसरण्याचा धोका अधिक असल्याने तूर्तास ‘जैसे थे’ परिस्थिती राहणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

उपनगरीय रेल्वे सर्वासाठी खुली करताना सुरुवातीस सकाळी सातपूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर सर्वाना प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा विचार आहे. अन्य वेळात मात्र सध्याच्या र्निबधानुसारच प्रवासाची सवलत दिली जाईल. सध्या रेल्वे क्षमतेच्या ८०-९० टक्के गाडय़ा चालवत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण असल्याचेही त्यांनी सांगितले.