एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना रस्त्यावर मात्र पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घेत आहेत. लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही यासाठी रस्त्यांवर २४ तास दक्ष असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अनेक योद्ध्यांनाही करोनाची लागण झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही त्यांची जिद्द मात्र कायम आहे. नेमकं हेच दर्शवणारा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे.

मुंबई पोलीस दलातील २९ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका आली असता हा पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना कोणतीही काळजी करु नका असं सांगताना व्हिडीओत दिसत आहे. “काही टेंशन घेऊ नको रे मित्रा”, असं हा पोलीस कर्मचारी बोलताना ऐकू येत आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या या योद्ध्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, “करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या आमच्य २९ वर्षीय योद्ध्याने जे आम्ही सांगायचा प्रयत्न करत आहोत ते थोडक्यात सांगितलं आहे”.


हा व्हिडीओ पाहून अभिनेता रितेश देशमुखदेखील भारावला आहे. त्याने ट्विरला प्रतिक्रिया देताना तुम्हा सर्वांना माझा सलाम असल्याचं म्हटलं आहे.

करोनाविरोधातील लढाईत आरोग्य कर्मचारी आणि पोलीस सर्वात पुढे राहून लढत आहेत. आतापर्यंत राज्यातील जवळपास १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये २० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त पोलीस मुंबईतील आहेत. तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. यानंतर खात्याने ५५ हून जास्त वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचा आदेश दिला आहे.