राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. शिवसेना खासदार संजय राऊतदेखील बैठकीला उपस्थित होते. संजय राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. शरद पवारांनी आधी राज्यपाल आणि नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय कारण होतं याबद्दल चर्चा सुरु आहे.

संजय राऊत यांनी या भेटीबद्दल बोलताना सांगितलं आहे की, “शरद पवारांच्या मातोश्री बैठकीवरुन गदारोळ होण्याचं कारण नाही. यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काऱण नाही, मीडियाला कळलं नाही म्हणूनच या बैठकीला गुप्त बोललं जात आहे. राज्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसंच जर आम्ही शरद पवारांकडून मार्गदर्शन घेतलं असेल वाईट वाटण्याचं काऱण नाही. फक्त आम्हीच नाही तर राज्यातील विविध पक्षांचे अनेक महत्त्वाचे नेते शरद पवारांशी चर्चा करतात. खुद्द पंतप्रधानही शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात. महाराष्ट्र राज्य घडवण्यात शरद पवारांचं मोठं योगदान आहे. ज्या सरकारचे ते शिल्पकार आहेत त्यांच्याशी चर्चा केली म्हणून गदारोळ कऱण्याचं कारण नाही”.

“शरद पवार मार्गदर्शन करत असतील तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आजही ते मार्दर्शकाच्या भूमिकेत आहेत. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

“विरोधकांना करोनाचा काळ असल्याने वेळ घालवण्यासाठी काही खेळ करावं असं वाटत असेल तर शुभेच्छा आहेत. ज्या कोणाला आनंद घ्यायचा आहे तो घेऊ द्या. राज्य संकटात असताना सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अशी भूमिका विरोधकांनी घेणं राज्याच्या हिताचं आहे,” असंही ते म्हणाले आहेत. ठाकरे सरकार हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांचं आहे असंही यावेळी ते म्हणाले.

“राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने करोना हाताळण्यासंबंधी निष्कर्ष काढला आहे ते गंभीर आहे. सरकारी रुग्णालयं अंधारी कोठड्या झाल्या आहेत. रुग्णालयांची स्मशाने झाली आहेत असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. तेथील राज्यपांलनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज दिली पाहिजे आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

बैठकीत काँग्रेसचे नेते हजर नव्हते असं विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “गेल्या चार बैठकांना काँग्रेसचे नेते होते. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत तर तातडीच्या गोष्टीत शरद पवार नेहमी उपस्थित असतात”. “पुढील पाच वर्ष सरकारला अजिबात धोका नाही. धोका असेल तर विरोधी पक्षाला आहे. राज्याला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. आपल्या पक्षाची काळजी करावी. सरकार उत्तम आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.