सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या  ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे.

“सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. करोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईत सोमवारी एका दिवसात ३१३९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रीय रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. मुंबईतील करोनामुक्तीचा दर ५० टक्के झाला आहे. मात्र दिवसभरात १०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत नवे १०६६ रुग्ण आढळून आल्यामुळे मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा ५९,२०१ वर गेला आहे. तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा २२४८ वर गेला आहे. ५८ रुग्णांपैकी ३९ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यात ३७ पुरुष तर २१ महिला होत्या. मृतांमध्ये २५ रुग्णांचे वय ६० वर्षांंवरील होते.

दरम्यान, एका दिवसात ३१३९ एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्णांना घरी पाठवण्यात आल्यामुळे करोनामुक्तीचा दर चांगलाच वाढला आहे. आतापर्यंत ३० हजार १२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २६,८२८ रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करोनामुक्त रुग्णांचा आकडा सक्रीय रुग्णांपेक्षा वाढला असल्यामुळे मुंबईत आता सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत जाणार का, याकडे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागणार आहे.

दुसरीकडे करोनासंबंधी परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. करोना महामारी तसंच अर्थव्यवस्थेला गती देण्यासंबंधी यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन दिवस ही चर्चा आयोजित आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी बुधवारी चर्चा होणार आहे.