मुंबईमधील करोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावी येथे नियुक्त करण्यात आलेल्या ३७ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका ५७ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा (एएसआय) करोनासंसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये करोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आठवर पोहचली आहे. राज्यभरात करोनामुळे ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या शनिवारी (१६ मे २०२०) एक हजार १४० वर पोहचली आहे. या पैकी ९४९ कर्मचारी हे पोलीस हवालदार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाचा लागण झाल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक भावनिक ट्विट केलं आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये काही पोलीस कर्मचारी दिसत असून, त्यावर ‘कोणी पाच कोटी दिलेत कोणी पाचशे कोटी दिलेत आम्ही आमचं आयुष्य देतोय’ अशी ओळ लिहिण्यात आली आहे. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निधनानंतर त्यांच्या प्रोफाइलवर त्यांनीच पोस्ट केलेला हा जुना फोटो पोलिसांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. “खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना,” असे कॅप्शन या फोटोला पोलिसांनी दिले आहे.

करोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत. राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे ३ हजार २०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने राज्यात सध्या पोलीस दल कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यातच येत्या काळात रमाझान ईदचा सण आहे. त्यादृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात तातडीनं केंद्रीय शसस्त्र दलाचे दोन हजार पोलीस कर्मचारी म्हणजेच २० कंपन्या पाठवाव्यात, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.