करोना प्रादुर्भावासंदर्भातील खोट्या बातम्या, अफवा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार केला तर नेटिझन्स आणि सोशल मीडिया युझर्सविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी यासंदर्भात रविवारी एक आदेश जारी केला आहे. या पत्रानुसार अशाप्रकारच्या माहितीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल आणि त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. “सोशल मिडिया अ‍ॅप किंवा मेसेजिंग अ‍ॅपवर एखादी खोटी माहिती पसरवली जात असेल तर त्यासाठी त्या ग्रुपच्या अ‍ॅडमीनला जबाबदार ठरवण्यात येईल,” असा स्पष्ट उल्लेख हा आदेश जारी करण्यासंदर्भातील  पत्रकात आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरु झाली असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी करवाई करण्यात येणार असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. मात्र पोलिसांनी जारी केलेल्या आदेशावरुन आता राजकारण रंगण्याची चिन्ह दिसत आहे. मुंबई भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी या आदेशाला ‘गँग ऑर्डर’ असं म्हटलं आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामध्ये “चुकीच्या बातम्यांचाप्रसार, चुकीची माहिती, चुकीची माहिती देणार मेसेजेस, व्हिडिओ (संपादित केलेले आणि स्वत: तयार केलेल दोन्ही), फोटो किंवा मिम्स (संपादित आणि स्वत: तयार केलेले) या स्वरूपात अशा आक्षेपार्ह  माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, टिकटॉक, इंस्टाग्राम इ. सारख्या इंटरनेट मेसेजिंग व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑडिओ क्लिप व इतर प्रकारे महिती पसरवली जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत, संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच कोवीड १९ चा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केल्या जात असणाऱ्या उपाययोजनांबद्दल आणि काही ठराविक समुदायांबद्दल वैर भावनेचे वातावरण आणि अविश्वास निर्माण झाला आहे.

“मेसेजिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अ‍ॅडमीन म्हणून नियुक्त केलेल्या सर्व व्यक्ती किंवा स्वत: हून किंवा ग्रपच्या कोणत्याही सदस्याला परवानगी देऊन त्यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या ग्रुपकडून अशा प्रकारच्या माहिती प्रसारित झाल्यास त्यासाठी अ‍ॅडमीनला वैयक्तिकरित्या जबाबदार ठरले जाईल,” असंही या आदेशामध्ये म्हटलं आहे. पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) प्रणय अशोक यांनी स्वाक्षरी केलेले हा आदेश एप्रिलमध्ये जारी केलेल्या मागील आदेशाचा मुदतवाढ देत जारी करण्यात आले आहे. या आदेशाच्या माध्यमातून करोनासंबंधित चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

भाजपाने या आदेशाला विरोध केला आहे. “आपत्कालीन परिस्थिती ही काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रक्तातच आहे. महाराष्ट्रामध्ये जारी करण्यात आलेला ही गँग ऑर्डर पाहा,” असं ट्विट सुरेश नाखुआ यांनी केलं आहे.

काही दिवसापूर्वीच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या एक ट्विटवरुन पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं होतं. सोमय्या यांनी जुना व्हिडीओ चुकीच्या माहितीसहीत शेअर केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर सोमय्या यांनी तो व्हिडिओ ट्विटवरुन डिलीट केला होता.