बोरिवलीच्या अपेक्स रुग्णालयाकडून लुबाडणूक; रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप

मुंबई : बोरिवलीतील अपेक्स रुग्णालयाने महिनाभराच्या करोना उपचाराचे नऊ लाख रुपये बिल आकारले असून यात अतिदक्षता विभागाचे दर दिवसाचे २७ हजार रुपये लावले आहेत. असे असतानाही योग्य उपचार न दिल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी के ला आहे.

बोरिवली येथील ५५ वर्षीय महिलेला मेच्या पहिल्या आठवडय़ापासून ताप येत असल्याने करोनाची चाचणी करण्यात आली. ती सकारात्मक आल्याने नातेवाईकांनी त्यांना बोरिवलीच्या अपेक्स रुग्णालयात ७ मे रोजी दाखल केले. आम्हाला रुग्णाची तब्येत सुधारत असल्याचे सांगण्यात येत होते. वेळोवेळी आम्ही रुग्णालयाची बिले भरत होतो. चौदा दिवसांनंतरही रुग्णाच्या प्रकृतीविषयी ठोस माहिती मिळत नसल्याने आम्ही पुढील बिले भरण्यास नकार दिला. त्यावर रुग्णालय प्रशासनाने पुढील उपचार केले जाणार नाहीत, असे सांगितले. डॉक्टरांनी त्या ऑक्सिजनवर असून हळूहळू श्वास घेण्याची पातळी वाढत असल्याचे सांगितले.

नातेवाईकांनी पुन्हा एक लाख रुपये जमा के ले. त्यानंतर आठच दिवसांत त्यांची प्रकृती बिघडल्याने कृत्रिम श्वसन यंत्रणा लावण्यात येत असल्याचे सांगितले. २८ मे रोजी त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती त्यांचे जावई ललित भंडारी यांनी दिली. रुग्णालयात शव आणण्यास गेल्यावर बिल पाहून थक्क झालो. तोपर्यंत आम्ही सव्वापाच लाख रुपये कसे तरी भरले होते, असे ललित यांनी सांगितले.

बिल भरल्याशिवाय शव देणार नाही अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्यावर नातेवाईकांनी मनसेचे स्थानिक नेते नयन कदम यांच्याकडे तक्रोर के ली. कदम यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाच्या मनमानीविरोधात आवाज  उठवला. त्यानंतर रुग्णालयाने अंतिम बिल ७ लाख १३ हजारांवर आणले. रुग्णालयाने अवाच्या सवा बिल लावल्याने उर्वरित रक्कम भरली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यासंबंधी रुग्णालयाशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकलेला नाही.

बिलातही गोंधळ

रुग्णालयाने अतिदक्षता विभागाचे प्रतिदिन २७ हजार रुपये आकारले होते. दरनियंत्रणानुसार ८ हजारच घ्यायला हवे होते. नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर रुग्णालयाने २० मे रोजी दिलेल्या बिलात कपात करून २९ मेला नवे बिल दिले. परंतु नव्या बिलात अतिदक्षता विभागाचे दर कमी केले, पण दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टरांची भेट १५ वेळा दाखवून ५२ हजार रुपये उकळले. ही भेट आधीच्या बिलात एकदाच दाखवून ३,५०० रुपये आकारण्यात आले होते. दुसरीकडे अंतिम बिलात पाच लिटरपेक्षा अधिक ऑक्सिजनसाठी दर दिवशी पाचशे रुपये अधिकचे लावले आहेत.

नेमके दर काय लावले?

शासनाच्या नियमावलीनुसार अतिदक्षता विभागातील रुग्णाला रक्त, लघवी याच्या चाचण्यांचे स्वतंत्र दर लावण्याची मुभा नाही. रुग्णालयाने याचेही १५ हजार रुपये आकारले आहेत. वैयक्तिक सुरक्षा साधनांमध्ये पीपीई किट ५ हजार रुपये, फेस शिल्ड आणि एन-९५ मास्क प्रत्येकी १ हजार रुपये, कर्मचारी व्यवस्थापन २ हजार रुपये, स्वच्छता दर १ हजार रुपये असे दर दिवशी दहा हजार रुपयांचे अतिरिक्त दर लावले आहेत.

बिलाविषयी येथे तक्रार करा राज्य पातळीवर तक्रार करण्यासाठी complaints.healthcharges@jeevandayee.gov.in मुंबई शहरातील रुग्णालयाविरोधात तक्रारीसाठी  collector.mumbaicity@maharashtra.gov.in उपनगरासाठी collector.mumbaisuburban@maharashtra.gov.in जिल्हा पातळीवरील तक्रारीसाठी वरील पत्त्यामध्ये जिल्ह्याचे नाव नमूद करावे. उदाहरणार्थ, collector.pune@maharashtra.gov.in