पालिका कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता नगरसेवकांचीही बायोमेट्रिक अर्थात यांत्रिक पद्धतीने हजेरी नोंदवली जाणार आहे. पुढील महिन्यापासून त्याची सुरुवात होणार असून गटनेत्यांच्या बैठकीत या पद्धतीच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली. येताना व जाताना अशा दोन्ही वेळेला उपस्थितीची नोंद होणार असल्याने सभागृह सुरू झाल्यानंतर हजेरीपटावर सही करून पळ काढणाऱ्या नगरसेवकांना चाप बसणार आहे. गैरहजर नगरसेवकांचा भत्ताही कापला जाणार आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौर यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयांमध्ये आणि खात्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. जुलै २०१७ पासून हजेरीपट बंद करून बायोमेट्रिक हजेरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला. नगरसेवकांचीही बायोमेट्रिक हजेरी घ्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. सभागृहाबाहेर ठेवलेल्या उपस्थितीपटावर सही करून नगरसेवक आत येतात. परंतु बऱ्याचदा सही करून नगरसेवक सभागृहात न येता परस्पर निघून जातात. त्यामुळे सभागृहाच्या दरवाजावर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशीनसह सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी कोटक यांनी केली होती. या मागणीला सर्व गटनेत्यांनी मंजुरी दिल्यानंतर मंगळवारी या पद्धतीच्या अंमलबजावणीवर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढील महिन्यापासून ही पद्धत सुरू होईल.