|| शैलजा तिवले

केशप्रत्यारोपण, पोटाचा घेर कमी करणे, नाकाचा आकार बदलणे याकडे वाढते लक्ष

वाढत्या जाहिराती आणि इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणारी माहिती यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सौदर्य खुलविण्यासाठी होणाऱ्या कॉस्मेटिक किंवा सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियांकडे आता पुरुषांचाही कल वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत अशा शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

पूर्वी या शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांमध्ये स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण ९० आणि १० टक्के होते. हे प्रमाण आता ७० आणि ३० टक्क्यांवर आले आहे. पुरूषांमध्ये केशप्रत्यारोपण, पोटाचा घेर कमी करणे, छातीची गोलाई कमी करणे, नाकाचा आकार बदलणे अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांची मागणी वाढली असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले.

सुंदर दिसण्यासाठी म्हणून डोळ्यांचा, ओठांचा आकार बदलणे, कृत्रिम स्तन बसविणे आदी सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया स्त्रिया करून घेतात हे जरी खरे असले तरी आता हे चित्र बदलत आहे. मागील काही वर्षांपासून पुरुषही सौदर्यवर्धक शस्त्रक्रिया मोठय़ा प्रमाणात करवून घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या सौंदर्यवर्धक शस्त्रकियांसाठी येणाऱ्या पुरुषांची संख्या मोजकीच होती. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून अशा शस्त्रक्रियांची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने या शस्त्रक्रियांकडे पुरुषांचा ओघही वाढला आहे.

हल्ली तरूण वयातच केस गेल्याने चेहऱ्याचे सौंदर्य हरपल्याच्या भावनेने अनेक पुरुष केशप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून डोक्यावर पूर्ववत केस रोवून घेतात. मुलींप्रमाणे छाती फुगीर झाल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या किशोरावस्थेतील मुलांचे प्रमाणही हल्ली वाढले आहे. स्तनग्रंथींची वाढ झाल्याने आपली छाती मुलींप्रमाणे भासत असल्याने या मुलांना मानसिक दडपण आले असते. तेव्हा वाढलेल्या स्तनग्रंथी काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या गायनेकोमॅस्टि या शस्त्रक्रियेची मागणीही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. तसेच नाकाचा आकार बदलून सौंदर्य खुलविण्याकडे पुरुषांचाही कल हल्ली वाढत आहे, असे भाटिया रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जन डॉ. शैलेश रानडे यांनी सांगितले.

सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया महागडय़ा असल्याने केवळ उच्चभ्रू वर्गातील लोक त्या करून घेतात असे नाही. तर आता उच्च मध्यम आणि मध्यम वर्गातील पुरुषही मोठय़ा प्रमाणामध्ये या शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असल्याचेही डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले.

पोटाचा वाढलेला घेर कमी करणे, सिक्स पॅक करणे यासाठी केल्या जाणाऱ्या लायपोसक्शन शस्त्रक्रियेची मागणीही वाढत आहे. यामध्ये पोटाची किंवा शरीरातील इतर भागाची वाढलेली चरबी काढली जाते. यासाठी मुख्यत: ३० ते ४० वयोगटातील पुरुष मोठय़ा प्रमाणात येत आहेत. विविध माध्यमांमधून दिसणारे रोल मॉडेल यांच्याप्रमाणे आपणही फिट दिसावे या उद्देशातून हे पुरुष बऱ्याचदा अशा शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे सौंदर्य शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांत पुरुषांचे प्रमाण ३० टक्क्य़ांवर गेले आहे, असे  रहेजा हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. पराग तेलंग यांनी सांगितले.

सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया या इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच असल्याने भूल देणे, रक्तप्रवाह होणे, जखमेमध्ये संसर्ग होणे आदी धोके उद्भवण्याची शक्यता असते. मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. शस्त्रक्रियेनंतरच्या काळामध्ये काही प्रमाणात धोके असतात. गायनोकोमेस्टिया या शस्त्रक्रियेनंतर छातीचा भाग काळा होतो. लायपोसक्शनसारख्या शस्त्रक्रियेनंतर त्या भागामध्ये काही काळ संवेदना नसतात. काहीवेळा  व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे शस्त्रक्रिया न झाल्याने ती पुन्हा करण्याची वेळ येते, असे कूपर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन घाग यांनी सांगितले.

पुरुषांमध्ये केल्या जाणाऱ्या सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियांसाठी साधारणपणे सुमारे ५० हजारापासून ते दोन लाखांपर्यतचा खर्च येतो. खर्चाचे हे अनुमान रुग्णालये आणि तेथील सुविधा यानुसार बदलते.

पुरुषांकडून होणाऱ्या सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया

केशप्रत्यारोपण, छातीची गोलाई कमी करणे (गायनेकोमॅस्टिया), पोटाचा घेर कमी करणे, सिक्सपॅक बनविणे (लायपोसक्शन), नाकाचा आकार बदलणे (रायनोप्लास्टी), कृत्रिमरित्या हनुवटीचा व गालांचा आकार बदलणे, डोळ्याच्या पापण्यांच्या सभोवताली वाढलेली चरबी व त्वचा काढणे (ब्लेफरोप्लास्टी), स्वत:च्या अंगातील चरबी काढून शरीराच्या विशिष्ट चरबीरहित भागात भरणे (फॅट इंजेक्शन), बोटॉक्स इंजेक्शन आणि लेझर सर्जरी